करमाळा प्रतिनिधी
करमाळा शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावरच काम करावे असे आदेश शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नागेश काळे (गुरव) यांना दिले आहेत. शिवसेना सचिव मोरे यांच्या भेटीसाठी करमाळा तालुका व शहर शिष्टमंडळ आज मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे दाखल झाले होते.
यावेळी सचिव संजय मोरे यांनी सांगितले की, सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू असून यामध्ये कोणालाही पदे काढण्याचा अधिकार पक्षाने दिलेला नाही. तसेच आपापसातले मतभेद मिटवून पक्ष वाढीसाठी सर्वांनी तात्काळ कामाला लागावे. यावेळी करमाळा तालुक्यातील शिवसेना पक्षवाढी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून नागेश काळे यांना कोणीही पदावरुन काढले नसून काळे हेच करमाळा शिवसेनेचे शहरप्रमुख असतील असा आदेश यावेळी मोरे यांनी करमाळा तालुक्यातील पदाधिकार्यांना दिलेला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शिवसेना शहर प्रमुख काळे यांनी सांगितले की, मी हाडामासाचा कट्टर शिवसैनिक असून गेली ४० वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. त्यामुळे मी कोणाच्याही दबावाला बळी पडून पक्ष सोडणार नाही. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार शहर प्रमुख पदावर कार्यरत राहत शेवटच्या घटकाला पदाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच लवकरच प्रत्येक वार्डात शाखा उघडणार असून आगामी काळात नगरपरिषदेसह सर्व निवडणूकात शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज असल्याचे ही यावेळी काळे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, वरिष्ठांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहत आगामी लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतानी निवडून आणण्यात शिवसेना सिंहाचा वाटा उचलणार आहे.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख दादासाहेब थोरात, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा वरकटणे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अनिकेत यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.