सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे
सोलापूर, दिनांक 13(जिमाका):- लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. सर्व सहायक निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिनांक 22 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत पूर्ण करावे. प्रशिक्षणाची जागा व अन्य सर्व सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात. हे दुसरे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचं असल्याने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड, माढा चे निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उप आयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,
निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सर्व सहायक निवडणूक अधिकारी व विवध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की, निवडणुकीचे प्रशिक्षण चांगल्या प्रकारे झाल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. त्यामुळे नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात देण्यात येणारी माहिती अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी. सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रशिक्षणासाठी चांगली जागा व त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जे पहिल्या प्रशिक्षणाला विना कारण अनुउपस्थित होते त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. ज्यांनी चुकीचे कारण दिले असेल किंवा सहायक निवडणूक अधिकारी यांचे समाधान होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील 3 हजार 617 मतदान केंद्रावर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या 71 ठिकाणी मतदारांना मतदानासाठी सुलभता व्हावी यासाठी स्वयंसेवकाना
प्रशिक्षित करावे. स्वयंसेवक हे मतदारांच्या सहायासाठी असून त्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची रांग व्यवस्थित असेल तसेच 85 वयोवर्षां पेक्षा अधिकचे मतदार व दिव्यांग मतदारांसाठी सहाय्य करावे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सुचित केले. तसेच दिनांक 11 एप्रिल 2024 पासून 48 एस. एस. टी. कार्यानवित झालेले असून या टीम मार्फत प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करावी. कोणत्याही प्रकारे वाहनांमधून रोख रक्कमेची तसेच अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी निर्देशित केले आहे.
जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने मोबाईल मेडिकल टीम तयार करून स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, स्वीप ऍक्टिव्हिटी, 1872 मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करणे, साहित्य वाटप, पोस्टल बॅलेट, खर्च समिती आदींबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सविस्तर आढावा घेऊन या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे, असे त्यांनी निर्देशित केले.
लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय 2 मतदान केंद्र तरुणांसाठी, 2 मतदान केंद्र महिलांसाठी व 1 मतदान केंद दिव्यांगासाठी आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करावे. तसेच जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व पोलीस शहर आयुक्त आदी मान्यवर ज्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत ते मतदान केंद्र ही अतिरिक्त आदर्श मतदान केंद्र करावेत, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी निऱ्हाळी यांनी केली. पोस्टल बॅलेट मतदान व इडीसी मतदान शंभर टक्के होण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती पोस्टल बॅलेट चे नोडल अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.
उमेदवाराला प्रचारासाठी देण्यात आलेल्या विविध परवानग्याची माहिती तात्काळ खर्च समितीला द्यावी -निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड
सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विविध राजकीय पक्ष व उमेदवाराला प्रचारासाठी देण्यात आलेल्या विविध परवानगीची माहिती तात्काळ खर्च समितीला द्यावी, त्या अनुषंगाने खर्च समिती सदरील कार्यक्रमाचे खर्चाच्या अनुषंगाने तपासणी करून त्या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाची नोंद उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत घेणे सहज शक्य होणार आहे, असे 42-सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड यांनी सांगितले.
नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी केलेल्या खर्चाचे तीन वेळा इन्स्पेक्शन खर्च समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवाराच्या खर्चाची नोंदवही व्यवस्थित मेंटेन झाली पाहिजे याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती तीन वेळा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्या प्रसिद्धीचा खर्च उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत नोंदवण्याची दक्षता ही घेण्यात यावी असे श्री. राठोड यांनी सुचित केले.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाची सूक्ष्मपणे नोंद घ्यावी, असे माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मृण्मय बसाक यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला रेट चार्ट, निवडणूक खर्चाची मर्यादा, स्वतंत्र बँक खाते असणे आदी माहिती देण्यात यावी असेही निवडणूक निरीक्षक यांनी सांगितले.