माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न
करमाळा प्रतिनिधी :- माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शिवसेना, युवा सेना व महिला आघाडीची बैठक करमाळा विधानसभा संपर्क प्रमुख रवी आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे पार पडली.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बैठक सुरु होताच महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आपली मते मांडताना दिसली.


त्यामुळे उपस्थित व नाराज असलेल्या पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना आमले म्हणाले की,
मागील कालावधीत शिवसैनिकांना काही अडचणी आल्या असल्यास आपण मुख्यमंत्री शिंदे व महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कानावर घालून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शिवसैनिकानी निश्चिंतपणे राहून आपली निवडणूक काळातील जबाबदारी चोखपणे पार पाडावी.


तसेच पुढे बोलताना आमले म्हणाले की, आजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले असून महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करायचे आहेत. यासाठी


शिवसैनिकानी जिवाचे रान करून शेवटच्या घटकापर्यंत पोहचत शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवित प्रचार यंत्रणा राबवावी तसेच शिवसेना हा महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असल्याने सर्वांनी एकदिलाने काम करुम महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणावे असे आवाहनही यावेळी आमले यांनी केले. यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड व शिवसेना उपतालुका प्रमुख दादासाहेब थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीसाठी युवासेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे, माजी तालुका प्रमुख बाळासाहेब कारंडे, शिवसेना उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, दिपक राख, सुभाष पाटील, प्रशांत नेटके, शिवसेना शहर प्रमुख नागेश काळे, महिला शहर प्रमुख गिता हेंद्रे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, उप शहर प्रमुख अनिकेत यादव, गणेश पवार, शाखा प्रमुख रुपाली शिंदे, फरीदा मुलाणी, कौशल्या शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *