जेऊर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्या करमाळा तालुक्यात नागरिकांच्या पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा व पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे. करमाळा तालुक्यातील पुर्व भाग हा पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त भाग म्हणून गणला जातो. हिसरे, हिवरे, फिसरे, साडे, शेलगाव (क), सालसे, नेरले,
आळसुंदे, वरकुटे, घोटी, निंभोरे, मलवडी, पाथुर्डी, केम, सातोली वडशिवणे, गुळसडी, खडकी, झरे अर्जुननगर,कोंढेज, बोरगावसह ७ गावे, कुकडी प्रकल्पात समाविष्ट असलेली गावे आदिसह अनेक गावांमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यरत नाहीत. यातील बहुतांश गावे ही जेऊरसह २९ गाव व कोर्टी सह १२ गावे या
पाणीपुरवठा योजनेत समावेश असलेली गावे असून या योजना बंद आहेत. तसेच रायगाव, भोसे, वंजारवाडी, जातेगाव, हुलगेवाडी, गोरेवाडी विहाळ, मोरवड, वीट आदि गावातही पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी जाणवते. तीव्र उन्हामुळे मागील भूगर्भातील पाणी पातळी खाली गेली आहे. यामुळे विहीरींचे पाणी आटले असुन बहुतांश कुपनलिका बंद पडल्या आहेत.
तहसिल प्रशासनाने तातडीने पाणी टंचाई बाबत या भागातील गावांचा अहवाल मागवून घ्यावा तसेच ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संयुक्त माहिती व अहवालानुसार टँकरने पाणीपुरवठा करावा लागतील अशी गावे
व वाडी वस्ती यांची नावे निश्चित करुन संबधित गावाकडून पाणी मागणी प्रस्ताव घेतले जावेत. तसेच प्राप्त प्रस्ताव तपासून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. उचित कार्यवाही करून पाण्याअभावी होणारी ग्रामस्थ व पशुधनाची गैरसोय टाळावी
अशी विनंतीही या निवेदनातून माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रशासनाकडे केली असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात आल्या आहेत.