करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीमधे प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच असून शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत १०५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे. शासन निर्धारीत हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतकऱ्यांनी आपला तुरीसह
अन्य शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे. सध्या तुरीची दररोज सर्वसाधारण पणे पाचशे कट्टे च्या घरात आवक होत असून दर वाढतच आहेत. तुरीला सरासरी दहाहजार
व कमाल साडे दहा हजारांहून अधिक दर मिळत आहे. तुरीसोबतच ज्वारी, हरभरा व मकेची देखील आवक आता वाढत आहे. तुरीच्या सरासरी उत्पादनात झालेली घट, तुरीची मागणी यामुळे दरात वाढ झालेली दिसत आहे. करमाळा बाजार समितीमधे
सध्या दररोज पन्नास लाखाची उलाढाल होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ओस पडलेल्या करमाळा बाजार पेठेवर याचा काही अंशी का होईना सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती माजी आ. जगताप यांनी दिली.