आदिनाथ कारखान्यातील कामगारांच्या ताटातील भाकर चोरणाऱ्या चोरांची सुध्दा चौकशी करण्यात यावी, दशरथआण्णा कांबळे
करमाळा-प्रतिनिधी
कामगारांच्या करोडो रुपयांच्या पगारी आदिनाथ कारखान्यातील पुर्वीच्या संचालक मंडळाने सुडापोटी रकडवून ठेवल्या आहेत. कारखान्यामध्ये तत्कालीन असलेली साखर विकून कामगारांच्या पगारी व्हाव्या. यासाठी शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने अनेक आंदोलने, विविध मोर्चे काढण्यात आले. MSC बँकेला भांडून कारखान्यामध्ये असलेली साखर विकून, कामगारांच्या हक्काचे चार कोटी रुपये औद्योगिक न्यायालयात जमा करण्यात आले. परंतु त्या रकमेसाठी औद्योगिक न्यायालयात कामगारांचे हजेरी पत्रक आणि पगारपत्रक जमा करणे गरजेचे असताना, अद्यापपर्यंत कारखाना प्रशासन ते जमा करत नाही. न्यायालयात जमा असलेल्या रकमेतुन कामगारांच्या किमान चार-चार पगारी तरी होतील. परंतु तत्कालीन कारखाना संचालक मंडळ आणि सध्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक अरुण बागनवर, यांनी कामगारांविषयी मनामध्ये असलेल्या रोषामुळे अद्यापपर्यंत औद्योगिक न्यायालयात पगारपत्रक आणि हजेरीपत्रक जमा केलेले नाही. आता सध्या शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यामुळे व अनेकांच्या घरी शुभकार्यासारखी अनेक कार्यक्रम येऊन ठेपले आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामगारांना दरवेळी प्रमाणे यावेळेस सुध्दा सावकारांच्या दारात जाऊन उभे रहावे लागत आहे.
तर पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, आदिनाथ कारखाना येथे अशासकिय प्रशासक म्हणुन महेश चिवटे आणि संजय गुटाळ यांची वर्णी लागली असता, त्यांनी कारखान्यामधील 2020 साली झालेल्या लाखो रुपयांच्या सामानाच्या चोरीचा पर्दाफाश करण्याविषयी सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे कामगारांच्या औद्योगिक न्यायालयातील जमा रकमेसाठी योग्य ते पगारपत्रक आणि हजेरीपत्रक घेऊन, औद्योगिक न्यायालयात जमा करावे. व आपली आदिनाथ कारखान्याच्या अशासकिय प्रशासक पदी झालेली निवड योग्य झाल्याचे सिध्द करावे. अशाप्रकारचे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथआण्णा कांबळे यांनी केले आहे.