नुकसानभरपाई लवकर मिळाली पाहिजे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा – माजी आमदार नारायण पाटील
करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार, नुकसानभरपाई लवकर मिळाली पाहिजे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. आता माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र तातडीने या नैसर्गिक संकटात प्रत्यक्ष नुकसान झालेल्या गावांना भेट देण्याचे ठरविले आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की अवकाळी पावसाने चिखलठाण, कुगाव, शेटफळ, अंजनडोह, दहिगाव, खडकेवाडी, देवळाली, जेऊर, सरफडोह, जेऊरवाडी, पोफळज, सोगाव, केडगाव, झरे, मांजरगाव, पोंधवडी, वाशिंबे, मलवडी, घोटी, पोथरे, खांबेवाडी, निलज, अर्जूनगर, पांडे, सौंदे, करंजे, पाथुर्डी, साडे, उमरड, दिलमेश्वर, गुळसडी व वरकटणे आदि 31 गावातील अवकाळी पावसाची व वादळ वारे याची नोंद करमाळा महसुलकडे असून आणखी अनेक गावांना या अवकाळी पावसाचा व वादळाचा फटका बसल्याची शक्यता आहे. करमाळा तालुक्यातील केळी, डाळींब, द्राक्षे, आंबा या नगदी फळबागांसह अनेक पिकांवर या अवकाळी पावसाचा व वादळाचा परिणाम झाला आहे. लाखो रुपये गूंतवून व पिक लागणीपासून खर्च व कष्ट करुन वाढवलेली पिके निसर्गाच्या एका संकटात जमिनदोस्त झाली आहेत. करमाळा तालूका हा केळीचा पट्टा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परदेशातही येथील केळीला मागणी असून जादा प्रमाणात केळीची लागवड या तालूक्यात होती. यामुळे झालेले नूकसान हे शेकडो कोटी रुपयांच्या पुढे असणार आहे. तातडीने नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे तयार केले जावेत व सदरचा माहिती अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा अशी विनंती आपण तहसिलदार यांना केली असून महसुल विभागानेही प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे.आपण स्वतः या नुकसान झालेल्या भागास भेट देणार असून शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगात धीर देऊन शक्य तेवढी शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावणार आहोत. फळवागा व पिकांच्या नुकसानी बरोबरच, पशुखाद्य, पशुधन यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी व नागरिक यांच्या राहत्या घरांची पडझड झालेली आहे. पाॅली हाऊस सारख्या मोठी गुंतवणूक केलेल्या प्रकल्पांना या अवकाळी पावसाने तडाखा दिला असून प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व बाबींची लेखी नोंद प्रशासनाने म्हणजेच महसुल व कृषी विभागाने एकत्रीतपणे नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन घ्यावी ही पहिली मागणी आपण केली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या नुकसानीबद्दल माहिती देऊन भरपाई मिळावी म्हणून आग्रह धरणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *