करमाळा प्रतिनिधी
इरा पब्लिक स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा
इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मोफत स्त्री रोग तपासणी शिबिर , विज्ञान प्रदर्शन व रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. अफ्रिन समीर बागवान(स्त्री रोग तज्ञ ,करमाळा) व सौ. हर्षाली प्रशांत नाईकनवरे(प्रगतशील महिला शेतकरी, शेटफळ-ना) यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. अफ्रिन बागवान यांनी महिलांना आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी, शरीराची काळजी कशी घ्यावी, आवश्यक आहार व निरोगी शरीर याविषयी मार्गदर्शन केले.
सौ. नाईकनवरे यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून कशाप्रकारे उत्कृष्ट महिला शेतकरी होता येते व शेतीला दुग्ध व्यवसाय कसा पूरक ठरतो याचे मार्गदर्शन केले. शेतकरी असल्याचा सार्थ अभिमान आहे हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. यावेळी या दोन्ही कर्तबगार महिलांना इरा पब्लिक स्कूल चिखलठाण यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या महिला दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला. या साठी कमलाई ब्लड बँक करमाळा यांचे सहकार्य लाभले.तसेच विज्ञान प्रदर्शनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात प्रशालेच्या 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध प्रयोगाचे सादरीकरण करून पालकांचे लक्ष वेधले. यावेळी खास लक्ष वेधले ते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सोलार सिस्टीम ने.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जवळ जवळ 135 महिलांनी लाभ घेतला.
रक्तदान शिबीरामध्ये 32 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपला सेवा भाव प्रकट केला. यामध्ये विशेष म्हणजे सौ. सरडे व सौ. जाधव या महिला पालकांनी सुद्धा रक्तदान करून आदर्शवत जागतिक महिला दिनाचे रूप समाजाला दाखवून दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरा पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.