करमाळा प्रतिनिधी

आपला विकास, आपला गाव” या उपक्रमाचे अंतर्गत करमाळ्याचे उपसभापती अजित विघ्ने यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.१ शाळेत भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी शाळेतील परिसराची स्वच्छता, पाण्याची कमतरता असून देखील माळरान फोडून त्यात काळी माती भरून मोठ्या जिद्दीने लागवड केलेली आणि बहरत असलेली विविध प्रकारची देशी झाडे, शौचालय तसेच किचन सेडची नजरेत भरणारी स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले. वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला,  विद्यार्थ्यांचे एकसमान दिसणारे हस्ताक्षर, विद्यार्थ्यांचे वाचन, विद्यार्थ्यांनी तालासुरात केलेले सुंदर कविता गायन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम, प्लास्टिकचा पुनर वापर करून रोपांची निर्मिती याबाबत शिक्षक बाळासाहेब बोडखे आणि बिभीषण सातपुते यांचे भरभरून कौतुक केले. येथे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता आनंददायी, कृतीशील आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यावर विशेष भर, विविध उपक्रम, स्पर्धा, खेळ आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम शाळेतील शिक्षकांकडून सातत्याने केले जात असल्याने ही शाळा लवकरच एक वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत त्यांनी या दोन्ही शिक्षकांचे कौतुक केले.

शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय जागरूकता, पर्यावरणपूरक तसेच व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सहकार्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असून, ‘शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविणे नव्हे, तर चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक घडविणे आहे.

यावेळी ॲड. विघ्ने यांच्या हस्ते कल्पवृक्षाचे अर्थात नारळाचे झाड लावून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनास प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी सरपंच अविनाश मोरे, शा.व्य.स.चे उपाध्यक्ष आप्पासाहेब धायगुडे, अंगणवाडी सेविका सुशीला मोरे, मदतनीस आरती मोरे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कोकरे, स्वयंपाकी अर्चना आरदड, शिक्षक बाळासाहेब बोडखे,  बिबीशन सातपुते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *