करमाळा प्रतिनिधी
स्व.सुखदेव साखरे सरांनी राजुरीच्या श्री राजेश्वर विद्यालयाच्या आपल्या मुख्याध्यापकपदाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीचे मोठे कार्य केले व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन अस्विनी हॉस्पीटल अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांनी राजुरी येथे बोलताना केले.
राजुरी ता.करमाळा येथील सुखदेव साखरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त राजेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या “स्व.सुखदेव साखरे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२५” हा पहिला पुरस्कार जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कृष्णाथ पांढरे यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉ.इनामदार बोलत होते.
एकनाथ महाराज हंडे यांच्याहस्ते अकरा हजार रूपये रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून प्राचार्य अंबादास पांढरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तानाजी देशमुख, विद्याविकास मंडळाचे सचिव विलास घुमरे, दत्तकला शिक्षणसंस्थेचे संस्थापक प्रा.रामदास झोळ, एन.आर.भुजबळ सर, मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, राजेश्वर विद्यालयाचे संस्थापक लालासाहेब जगताप, तानाजी झोळ, राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार संयोजन समितीचे कार्याध्यक्ष व राजेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी प्रास्ताविक करून या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली व प्राचार्य पांढरे यांच्या उपक्रमशील कार्य-कर्तृत्वाचा परिचय करून दिला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य पांढरे म्हणाले की, स्व.साखरे सरांच्या नावाने मला देण्यात आलेल्या या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. साखरेसरांनी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव ठेवून ज्या जिव्हाळ्याने मला हा पुरस्कार देण्यात आला तो निश्चितपणे संस्मरणीय स्वरूपाचा आहे. साखरे सरांच्या नावाला साजेसा असा आहे.
नंदकुमार जगताप यांनी मानपत्राचे वाचन केले तर श्रीकांत साखरे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रीकर अधिकारी तुकाराम जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर येथील स्टडी सर्कलचे संचालक सतिश मोरे, तालुका कृषि अधिकारी देवानंद सारंगकर, प्रवीण साखरे, कृषि अधिकारी नानासाहेब साखरे, विठ्ठल देशमुख, कुंडलीक साखरे, रावसाहेब जाधव, अशोक कचरे आदी माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक स्व.सुखदेव साखरे सरांच्या पुण्यतिथी समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

