
सोलापूर, दिनांक 9 (जिमाका):- शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध लोखाभिमुख योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजेच तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केल्या.

शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत उत्तर तहसिल कार्यालय सोलापूर यांच्यावतीने विशेष शिबीराचे आयोजन रंगभवन येथील सभागृहात केले होते. आमदार सुभाष देशमुख, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसिलदार निलेश पाटील, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, गट विकास अधिकारी बाबासाहेब पाटील तसेच अधिकारी कर्मचारी व लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाल्या, शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना भुमिहिन लाभार्थी, शिधापत्रिका वाटप, गोपिनाथ मुंढे अपघात विमा सानुग्रह अनुदान योजना अशा विविध योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहे. या योजना पात्र लाभार्थी पर्यंत पारदर्शी पोहोचविण्यासाठी आवश्यक दक्षता घेवून कार्यवाही करावी.
या शिबिरात 42 ब सनद- 90 लाभार्थी, 42 ड सनद- 35 लाभार्थी, पोटखराब प्रकरणे -280 लाभार्थी, कलम 55 आदेश- 25 लाभार्थी, भुविकास बैंकेचा बोजा नोंद कमी 29 लाभार्थी, तगाई बोजा नोंद कमी-136 लाभार्थी, संगायो लाभार्थी आदेश 120 लाभार्थी, गोपिनाथ मुंढे अपघात विमा सानुग्रह अनुदान योजना प्रकरणे-2 लाभार्थी, शिधापत्रिका वाटप-50 लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना भुमिहिन लाभार्थी-8 एकुण लाभार्थी 775 यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आदेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी निमंत्रीत मान्यवरांनी उपस्थित लाभार्थी व नागरिक यांना शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत विशेष शिबीराच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले व आभार तहसिलदार निलेश पाटील यांनी केले.