
करमाळा प्रतिनिधी
उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता रावगाव येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली.
मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी गावच्या वेशीत तसेच झाडावर, अंगणात दररोज सकाळी नित्यनियमाने पक्ष्यांचा किलबीलाट मोठ्या प्रमाणात ऐकु येत होता. परंतु वातावरण अचानक झालेल्या बदलामुळे करमाळा तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून उष्णतेचा पारा पस्तीशी पार गेल्याने विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबीलाट कमी झाल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई अचानक उष्णता वाढल्याने या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अशातच करमाळा तालुक्यातील रावगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या प्लास्टिकच्या बाटलीचा खालचा भाग कापून कल्पक बुद्धीने दोऱ्या बांधल्या आणि झाडांच्या मध्यभागी बांधून या भटकत्या चिमण्या, कावळे, आदी पक्ष्यांच्या पाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली. यावेळी पक्ष्यांविषयी असलेला जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि त्याचे अस्तित्व टिकून राहावे, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. या उपक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थी शाळेपुरतेच मर्यादित न राहता पर्यावरणीय संदेश देण्याची भूमिकाही पार पाडत आहेत याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.