सोलापूर, दिनांक 25(जिमाका):-भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील 42- सोलापूर(अ. जा.) व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होऊन 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी ही निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व शांततामय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परस्परात समन्वय ठेवावा. तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ही नियोजन करावे असे आवाहन सोलापूर 42-लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व 43-माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रूपाली ठाकूर यांनी केले.

         नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत निवडणूक निरीक्षक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड, अप्पर जिल्हाधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, संतोष देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

               निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर घेतलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षणाचे काही टप्पे पूर्ण झालेले असतील व उर्वरित टप्प्याचे ही प्रशिक्षण अत्यंत गांभीर्यपूर्वक प्रत्येकाने घेतले पाहिजे. प्रशिक्षण व्यवस्थित झाल्यास ईव्हीएम मशीन व्यवस्थितपणे हाताळणे शक्य होणार आहे. होम बेस्ड मतदानासाठी गोपीनियता पाळली गेली पाहिजे. त्याप्रमाणेच मतदानाची सरासरी टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावे असे आव्हान 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र यांनी केले. तसेच मतदार संघातील विधानसभा निहाय प्रत्येक स्ट्रॉंग रूम व बूथ पाहणी करणार असून प्रशिक्षण कार्यक्रमालाही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

              43 माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रूपाली ठाकूर यांनी सोलापूर जिल्ह्यात उष्णता मोठ्या प्रमाणावर असून मतदानाच्या दिवशीही उष्णतेची दैवत तीव्रता अधिक असणार आहे तरी प्रत्येक मतदार केंद्रावर प्रशासनाने मतदारासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध केलेल्या पाहिजेत. मतदारांची रांग खूप मोठी होणार नाही यासाठी मतदारांना टोकन देऊन वेटिंग रूम मध्ये बसवावे. मतदारांना सावली बरोबरच पिण्याच्या पाण्याची मतदान केंद्रावर व्यवस्था करावी. तसेच निवडणूक कर्तव्यावरील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही उष्णतेच्या अनुषंगाने स्वतःची काळजी घ्यावी व मतदान प्रक्रिया कोणतीही अडचण उद्भवणार नाही यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. त्याप्रमाणेच एखाद्या मतदान केंद्रावरील मशीन खराब झाल्यास त्या ठिकाणी दुसरे मशीन तात्काळ उपलब्ध करण्याची व्यवस्था गतिमान असली पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले.

         लोकसभा मतदार संघातील सर्व उमेदवार निश्चित झालेले आहेत. या उमेदवारा पैकी सात उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत. ते गुन्हे वृत्तपत्रातून व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तीन वेळा प्रसिद्ध झाले पाहिजेत याची खात्री करावी. तसेच त्यांच्या प्रसिद्धीचा खर्च समाविष्ट झाला पाहिजे असे निर्देश 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड यांनी दिले. उमेदवारांच्या प्रत्येक खर्चाचा हिशोब त्यांच्या खर्च नोंदवहीत आला पाहिजे यासाठी सर्व नियुक्त यंत्रणांनी अत्यंत तत्पर राहिले पाहिजे असेही त्यांनी निर्देशित केले.

        प्रारंभी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी करण्यात आलेल्या निवडणूक विषयक तयारीची माहिती दिली. यामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ उपलब्धता ईव्हीएम मशीन ची माहिती, वेब कास्टिंग करण्यात येणाऱ्या केंद्राची माहिती, संवेदनशील मतदान केंद्रे, जमा करण्यात आलेली शस्त्रे, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज, जिल्ह्यातील स्त्री पुरुष मतदार आदीची सविस्तरपणे माहिती देऊन सर्व मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन अत्यंत काटेकरपणे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगून जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आलेली असून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही मोहीम यशस्वी ठरेल असे त्यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *