करमाळा प्रतिनिधी
माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्या… अशा विविध मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष ॲड. राहुल सावंत, सुरेश बागल, भिमा सिताफळे, गोरख जगताप, दत्ता मुरूमकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा संपन्न झाला.
ॲड. राहुल सावंत (सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूर व अध्यक्ष हमाल पंचायत करमाळा) बोलताना म्हणाले की, सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध हमाल, तोलार, कामगार संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष व कामगार नेते डॉ. बाबा आढाव, आमदार नरेंद्र पाटील व इतर कामगार संघटनेचे नेते यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर माथाडी कायदा वाचवण्यासाठी व माथाडी कायदा सुधारण्याच्या नावाने
आणलेले विधेयक क्र. 34/2023 हे माथाडी कामगार विरोधी असल्याकारणाने ते तात्काळ रद्द करण्याबाबत व कामगारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील हमाल तोलार कामगार यांनी एक दिवस कामकाज बंद ठेवून सोलापूर येथे मोर्चात सहभागी झाले होते.
जोपर्यंत माथाडी कायदा संपुष्टात आणणारे विधेयक रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील. तसेच डॉ. बाबा आढाव यांचा आदेश येईल त्याप्रमाणे आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.
जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे म्हणाले की, शेतकरी व हमाल यांच्या मेंदूमधील राग व पोटातील आग सरकार चेतवत व पेटवत असेल तर सरकारवर नांगर व हूक फिरवल्याशिवाय राहणार नाही.
पणन संचालक चे दि. 16 जानेवारी 2024 रोजी चे परिपत्रक रद्द करावे. बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक रद्द करावे. जिल्ह्यातील वाराईची हमाली, हमाली कामामध्ये वर्ग करण्यात यावी, वगैरे मागण्या त्यांनी केल्या. आमच्या विविध मागण्या मान्य नाही केल्या तर आमचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाची सुरुवात सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व चार हुतात्मा पुतळ्या यांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा संपन्न झाला. यावेळी डॉ. बाबा आढाव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. माथाडी कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झालीच पाहिजे. कामगारांच्या मुलांना माथाडी बोर्डात नोकरी मिळालीच पाहिजे अशा विविध घोषणा देण्यात आल्या.