करमाळा प्रतिनिधी
बुधवार दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी पंचायत समिती सभागृह करमाळा येथे महाराष्ट्र शासन – कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर यांचे वतीने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त आयोजीत शेतकरी दिन व केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) माहिती व प्रसार यासाठी एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून युनियन बँक ऑफ इंडिया शाखा करमाळा चे शाखाधिकारी बालाजी हारके, जिल्हा संसाधन व्यक्ती( DRP) मनोज बोबडे व मंगेश भांडवलकर DRP , ॲग्रीकल्चर मार्गदर्शक इंजि. अमोल वाघमारे व तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा येथील कृषि सहाय्यक दत्ता वानखेडे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना कृषि पायाभूत सुविधा
निधी (AIF) योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी करमाळा संजय वाकडे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेमध्ये कसा सहभाग घ्यावा हे सुलभपणे समजणेसाठी कृषि विभागामार्फत प्रसारीत करण्यात आलेल्या माहितीपट व सादरीकरण यांचे प्रोजेक्टरचे सहाय्याने प्रसारण
दाखविण्यात आले. आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजयकुमार बागल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात AIF योजनाविषयी प्राथमिक माहिती सांगितली. तसेच शेतकरी दिनाचे निमित्ताने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत
गट, स्मार्ट प्रकल्पातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, PMFME योजनेतील लाभार्थी, सहाय्यक निबंधक – सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार युवक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून AIF योजनेविषयी माहिती घेतली. कार्यशाळेचे समारोप प्रसंगी उपस्थितांचे आभार आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सत्यम झिंजाडे यांनी मानले.