करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा ग्रामोद्योग भरारी सन्मान २०२३ चा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मुक्ताई गारमेंट या उद्योग समूहाला देण्यात आला.

महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेशजी बैस यांच्या शुभहस्ते राजभवन, मुंबई येथे मुक्ताई गारमेंटचे संचालक मंगेश चिवटे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, सचिव हर्षदीप कांबळे, खादी ग्रामोद्योग महामंडळ अध्यक्ष रवींद्र मराठे, मुख्य कार्यककारी अधिकारी आर. विमला, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, श्रेय फाउंडेशनच्या सीमा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागात पंतप्रधान रोजगार योजनेतून (PMEGP) मिळालेल्या अर्थसहाय मधून यशस्वी उद्योग उभा केल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील निवडक ८ उद्योजकांना आज राज्यपालांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बोलताना राज्यपाल महामहिम रमेशजी बैस म्हणाले की, खादी ग्रामोद्योग चा प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण भागात छोटे-छोटे उद्योग उभारून या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण करणे हा आहे. शहरात वाढणारे लोंढे थांबवून शहरांवरील वाढता ताण कमी करायचा असेल असेल तर ग्रामीण भागात लहान-लहान उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग महामंडळाची भूमिका महत्त्वाची आहे.

यावेळी बोलताना राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत म्हणाले की, आज पुरस्काराने सन्मानित झालेल्या उद्योजकांवर आता जबाबदारी वाढली आहे, यापुढील काळात आणखी व्यवसाय वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करा असे आवाहन केले. कारण, आज देशात नोकरी मागणाऱ्या हातांपेक्षा नोकरी देणाऱ्या उद्योजकांची गरज आहे.

………………………

मंगेश नरसिंह चिवटे, (कार्यकारी संचालक, मुक्ताई गारमेंट)

करमाळयातील श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीमध्ये मुक्ताई गारमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत ३० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मुक्ताई गारमेंटच्या माध्यमातून पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांना डोळ्यांसमोर ठेवून शर्ट, शालेय युनिफॉर्म निर्मिती सुरू केली. यामुळेच अल्पावधीतच स्पार्क शर्ट ब्रँड झाला असून याचे सर्व श्रेय माझे आई-वडील मोठे बंधू उद्योजक महेश चिवटे आणि या शर्ट फॅक्टरी साठी अविश्रांत मेहनत घेणारे आमच्या सर्व कर्मचारी बांधवाना जाते. आजचा ग्रामोद्योग भरारी पुरस्कार हा या सर्वांना अर्पण करत आहे. येणाऱ्या काळात करमाळयात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,   राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *