करमाळा प्रतिनिधी
पोंधवडी चारीचे काम पूर्ण झाल्यानंतर 3 ऑगस्ट पासून कुकडी प्रकल्पाचे पाणी पोंधवडी चारीसह उपचारीतून चाचणीसाठी सुरू झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मा. सांगळे साहेब हे आज दि.6 ऑगस्ट रोजी कोर्टी येथे आले होते. जागोजागी शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
हवालदारवाडी नजीकच्या चारीची पाहणी करून मा. सांगळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शेतकऱ्यांचे वतीने निवृत्त कृषी अधिकारी निळकंठ अभंग मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आमदार संजयमामा शिंदे यांच्या महत्प्रयासाने पोंधवडी चारीचे काम पूर्ण झाल्यामुळे आज कोर्टीसह इतर परिसरामध्ये शेतकऱ्यांना पाणी पाहायला
मिळाले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी सुखावून गेलेला आहे, असे असले तरीही आता चाचणीसाठी आलेले पाणी भविष्यातही रोटेशन प्रमाणे मिळावे, चाऱ्यांचे अस्तरीकरण व्हावे, काही उपचारी यांची कामे अपुरी आहेत, काही चाऱ्या झाडाझुडुपांनी, मातीने बुजलेल्या आहेत. त्याच्या दुरूस्त्या व्हाव्यात. कोर्टी गावाच्या परिसरात जरी पाणी मिळत असले तरी वनखात्याच्या
अडचणींमुळे गोरेवाडी ते कोर्टी गावठाण लगत पर्यंत जाणाऱ्या ओढ्याच्या पश्चिम भागाला पाणी मिळत नसल्याने ते क्षेत्र वंचित राहत आहे. हुलगेवाडी ते शितोळे वस्तीकडे जाणाऱ्या चारीची लांबी वाढवून ते लगत असलेल्या ओढ्यामध्ये सोडल्यास आजूबाजूच्या परिसरात विहीरी व बोअर चे पाणी वाढून काही अंशी दिलासा मिळेल.
ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना अधीक्षक अभियंता सांगळे म्हणाले की, याबाबत प्रस्ताव तयार करून सादर केल्यास निश्चित विचार करू असे आश्वासन दिले. यावेळी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धायगुडे, उपअभियंता शिंदे, शाखा अभियंता श्रीरंग मेहेर, निळकंठ अभंग, अदलिंगे, सुभाष अभंग, शिवाजी गावडे, रूपचंद गावडे, दादा गावडे, विकास गावडे, हगारे व शेतकरी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांचे आभार दादा गावडे यांनी मानले.