
करमाळा तालुक्यात सध्या पक्षीय चिवचिवाट जोरात सुरू आहे …विवेक येवले
कुणी मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश तर कुणी रीटेवाडी उपसाचा झेंडा हातात घेऊन रोजच मीडियासमोर फडकवत आहे…
एकूणच तालुक्यात पक्षीय विकास जोरात सुरू आहे.
विकास कोणाला नको आहे ?
तो तर हवाच आहे …

पण प्रश्न हा आहे ?
2014 ते 2019 आमदार ह्याच पक्षाचे …राज्य आणि केंद्रातील सरकार ही ह्याच पक्ष्यांचे …
मग त्यावेळेस का नाही हे विषय पुढे आले… मार्गी लागले… दोन्ही पक्ष त्यावेळी शांत का होते ?
नक्कीच दाल मे कुछ तो काला है !

खरंतर 2019 ते 2022 ह्या महाविकास आघाडीच्या काळात याची बीजं रोवली गेली … पेरली गेली…त्यांना अंकुर फुटले… पेरणी जोरदार साधली.
2023 मध्ये त्यांना फळं येण्याची चिन्ह दिसू लागली.
आणि पक्षीय चिवचिवाट जोरात सुरू झाला…
ह्या सगळ्या गोंधळात पेरणी करणारा मात्र जाणीवपूर्वक बाजूला राहिला…

कारण आपण केलेली पेरणी साधलीच पाहिजे…
त्याला विकासाची फळं आलीच पाहिजे हीच त्याची खरी भावना…
तसं बघितलं तर आम्ही जातेगाव टेंभुर्णी रस्त्याचे पेढे वाटले…
आमच्यामुळेच तर दहिगाव उपसा सिंचन योजनेची सुप्रमा मंजूर झाली…
आम्हीच आदिनाथ कारखाना खाजगीकरणाच्या तावडीतून वाचवला...
आम्हीच करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत आवाज उठवला…
आम्हीच देवीच्या माळाच्या रस्त्याचा प्रश्न पेटवला…

आम्हीच रीटेवाडी उपसा सिंचन योजनेचा झेंडा फडकवला …
एकूणच आमच्यामुळेच तर तालुक्याचा विकास झाला !
आमच्यामुळेच तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणारी दहिगाव योजना मे महिन्याच्या सुरुवातीलाच बंद पडली…
आमच्यामुळेच तर दहिगाव पट्ट्यातील व उजनी बॅक वॉटर पट्ट्यातील शेतकऱ्यांची केळी अन उसांची उभी पिके करपून गेली …
आमच्यामुळेच तर 3 वर्षात तळ न गाठणाऱ्या उजनी धरणानं मे महिन्यातच तळ गाटला…
आमच्यामुळेच तर भीमा नदीला 5 आवर्तन सुटली… आमच्यामुळेच तर भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सक्तीची विश्रांती भेटली…
आमच्यामुळंच असं अजून बरंच काही बाही व्हायचं आहे…
अजून आमच्या गळ्यात आमदारकीची माळ पाडायची आहे …
मग तर बघा तालुक्याचा विकास कसा वेगाने होतोय… आज सुपारी
उद्या हळदी
परवा लग्न

तेरवा लेकरूच होतंय
त्याच्या बारशाचा कार्यक्रमही आम्ही धुमधडाक्यात घालणार आहोत!
पण…खरं सांगायचं तर या असल्या नौटंकीचा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वीट आलाय याचं भान या सोंगाड्यांना कसं असणार?कुणाचं तरी शेपूट धरून,सोशल आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून चमकोगिरी करून स्वयंघोषित नेतेगिरी करणाऱ्याना आणि या माळेतील बहुतेक “नमुन्याना”मतदारांनी वेगवेगळ्या निमित्ताने त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे.अर्थात त्यातून शहाणी होणारे हे नमुने नाहीतच म्हणा!असो…
पण आता या तालुक्यातही जनता ही राजकीयदृष्ट्या सुशिक्षित झालेली असल्याचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झालेले आहे.त्यामुळे आता यापुढे असल्या निष्फळ नौटंकीला जनतेची साथ मिळेल असं समजणारे हे “मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत” हे सांगणे न लगे !
– विवेक शं.येवले