प्रा. सरक यांच्या सेवापुर्ती सोहळ्यासाठी मा. आ. सावंत यांना आमंत्रित

जेऊर प्रतिनिधी     

प्रा. अर्जूनराव सरक यांच्या सेवापुर्ती सोहळ्यासाठी मा. आ. दत्तात्रय सावंत यांना आमंत्रित केल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव प्रा. अर्जूनराव सरक हे दि. 31 मार्च रोजी शिक्षण सेवेतून निवृत्त होणार आहेत. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत असून आज सेवापुर्ती सोहळा समितीच्या शिष्टमंडळाने मा. आमदार दत्तात्रय सावंत यांना निमंत्रण दिले. यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक नवनाथ मोहोळकर, करमाळा तालूका माध्यमिक शिक्षक

पतसंस्था सचिव पांडूरंग वाघमारे, आदर्श क्रिडा शिक्षक भीमराव सरक, अमोल पाटील सर आदि उपस्थित होते. सेवापुर्ती सोहळ्याची जोरदार तयारी चालू असून अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की, आज पंढरपूर येथे जाऊन पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे मा. आमदार दत्तात्रय सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेतली व कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले. दि. 31 तारखेस विचारवंत व लेखक महेंद्र कदम यांनी यापूर्वीच आपली वेळ दिली असून त्यांचे ‘ग्रामीण शिक्षण व्यवस्थेपुढील

आव्हाने व संधी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. करमाळा मतदार संघातील विविध शिक्षण संस्थेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरू असून या शिवाय राजकीय व सामाजिक संघटनेतील मान्यवरांनाही सन्मानाने निमंत्रित करण्यात येत आहे. सेवापुर्तीचा हा सोहळा निश्चितच सध्याच्या शिक्षण पद्धती व प्रश्नांवर प्रकाश टाकणारा ठरावा यासाठी आम्ही सर्व संयोजक प्रयत्न करत असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या

मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. आज मा. आमदार दत्तात्रय सावंत यांनी आमंत्रण स्वीकारले असून त्यांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी आपला खास वेळ सुद्धा राखीव ठेवला असल्याचे सांगितले. लवकरच एका पत्रकार परिषदेत या सेवापुर्ती सोहळ्याची सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले. मा आ. दत्तात्रय सावंत यांच्या सह सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन समाधान घाडगे, संचालक मारुती गायकवाड आदिंनाही या भेटीत आमंत्रण पत्रिका देण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *