सोलापूर येथील विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक तसेच टॉवर बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. माजी आमदार यांची महाराष्ट्र शासनाने नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्य पदी नियुक्ती केली आहे. यामुळे आता सदर स्मारकाच्या पुर्णत्वासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली असून याबाबत 21 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णय क्र स्मारक-2021/ प्र क्र 22/विशी 2 नुसार या कामासाठी निधीची मंजूरी व कामाबाबत माहिती दिली आहे. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर स्मारकातील चबुतरा बांधकाम, लॅन्डस्केप व सुशोभीकरण तसेच टॉवर बांधकामासाठी एकुण 14 कोटी 24.लक्ष 92 हजार 238 इतक्या अंदाजपत्रकात नमुद केलेल्या निधीस व कामास प्रशासकीय मंजूरी दिली. यानुसार दि 21 फेब्रुवारीला एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आता अडचण येणार नाही. या अगोदर 1 कोटी 73 लक्ष 91 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात आला होता. सध्या निधी अभावी या स्मारकाची कामे ठप्प होती. परंतु आता निधी मंजुर झाल्याने या कामांना वेग येणार आहे. सदर कामाच्या पुर्णत्वासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव व स्मारक समिती यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा चालू असून
वेळेत हे स्मारक पुर्ण व्हावे हा सर्वांचा उद्देश आहे. राज्यातील बहुसंख्य जनतेच्या अस्मितेचा केद्रबिंदु असलेल्या या स्मारकाच्या कामासाठी आपण स्वतः लक्ष देणार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांना राजकीय बळ देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असुन यातुनच मग सोलापूर जिल्हा
नियोजन समिती सदस्य व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समिती सदस्य यावर माजी आमदार नारायण पाटील यांची वर्णी लागली आहे. आदिनाथ कारखान्याच्या बाबतीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्यामागे राजकीय बळ दिल्याने यंदाचा गाळप हंगाम सुरु झाला होय. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी सुद्धा माजी आमदार नारायण पाटील यांचे विशेष प्रयत्न व पाठपुरावा चालू असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.