आदिनाथची प्रगती समाधानकारक कारखाना सक्षमपणे सुरू – मा संचालक वसंतराव पुंडे
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेवटी बऱ्याच अडचणीतून मार्ग काढून सक्षमपणे चालू झालेला आहे. आदिनाथ ची साखर बाहेर पडलेली असून गळितास येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसास रोख काटा पेमेंट व वाहतूक मिळत असल्याची माहिती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर वसंत पुंडे यांनी पत्रकार परिषद दिली आहे.
यावेळी पुढे बोलताना डॉक्टर पुंडे म्हणाले की, कारखाना जरी सध्या सक्षमपणे गळीत करत चालू असला तरी पुढील जबाबदारी मोठी आहे. ऊसाचे पेमेंट, वाहतुकीची बिले, कर्जाची परतफेड ,कामगारांचे पगार वेळेवर देणे गरजेचे आहे. त्याचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे. कारखाना दोन-तीन वर्ष बंद असल्याने तो चालू करण्यास उशीर झाला आहे . बऱ्याच ऊस कारखानदारांनी आपल्या परिसरातील ऊस पळवून नेला आहे. तरीही आदिनाथचा काटा योग्य असल्याने येणाऱ्या ऊसास वाहतूक व काटा पेमेंट मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आदिनाथ कारखान्याला
ऊस घालण्यासाठी उत्सुक आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालु करण्यासाठी अनेक जणांनी मनापासून मदत केलेली आहे. यामध्ये सर्वच नेते मंडळींनी, चेअरमन, संचालक मंडळ, कामगार, ऊस उत्पादक सभासद तसेच बचाव गटाचे सदस्य आदींचा सहभाग आहे. सध्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. आदिनाथ कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार आहे. यावेळी सभासदाने गटतट हेवेदावे न पाहता योग्य व सकारात्मक विचारांचे संचालक मंडळाला निवडून देणे गरजेचे आहे. अन्यथा परत परत तेच तेच मंडळ भ्रष्टाचार, वाद- विवाद, भांडणे आदि गोष्टीला तोंड द्यावे लागत आहे. त्या गोष्टी सभासदांना नको आहेत. सर्वच नेते मंडळींनी एकत्र बसून योग्य मार्ग काढावा. यामधून मार्ग निश्चित निघणार आहे. त्यामुळे आदिनाथ चे भविष्य उज्वल दिसणार आहे. भविष्यामध्ये आदिनाथ कारखान्याच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी करण्यासारखे आहेत.
इथेनॉल प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, आसावरी प्रकल्प,बगॅस आदि गोष्टी करण्यासारखे आहेत. आदिनाथ कारखाना एक बॉयलर व एक मिल वाढवून गाळप क्षमता वाढवू शकतो. साखर कारखान्याला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी इतर कारखान्याबरोबर स्पर्धेत उतरावे लागणार आहे. नुसत्या साखरेवर कारखाना चालविण्यापेक्षा उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे.आपल्या कारखान्याच्या शेजारील विठ्ठलराव शिंदे कारखाना श्रीपूरचे पांडुरंग कारखाना, सहकार महर्षी कारखाना आदि कारखान्याचा आदर्श घेऊन आपण आदिनाथ कारखाना का चालू ठेवू शकत नाही असा सवाल माजी संचालक डॉक्टर वसंत पुंडे यांनी केला आहे. आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत सर्वच प्रकारचे राजकारण संपले पाहिजे त्याच वेळेस आदिनाथ कारखान्याचे भविष्य उज्वल राहणार आहे. आदिनाथ च्या हितासाठी ऊस उत्पादक सभासदांनी अत्यंत गांभीर्याने या सर्वाचा विचार करावा तसेच नेते मंडळींनी ही आत्मचिंतन करून करमाळ्याची शान असलेला आदिनाथ कारखाना पुन्हा कसा भरारी घेईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे डॉक्टर पुंडे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.