एन. एस. एस. कँप ही आयुष्याची शिदोरी असते- प्राचार्य डॉ एल. बी. पाटील
करमाळा दि.८/०१/२०२३- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गुळसडी येथे घेण्यात आलेल्या विशेष श्रम संस्कार शिबिराचा आज समारोप झाला. या समारोप समारंभाच्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळसडी ग्राम पंचायतीचे उपसरपंच योगेश भंडारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. बी. पाटील हे उपस्थित होते तसेच अकलूज येथील एस एन डी टी महिला महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ ऋषी गजभिये, उपप्राचार्य प्रा संभाजी किर्दाक, माजी सरपंच संजीवनी यादव, उद्योजक प्रदीप यादव, सूरज भंडारे, प्रतीक बागल हे मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा प्रमोद शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त्त करतांना आठवड्यामध्ये केलेल्या कामांचा व व्याख्यानांचा परामर्ष घेणारे व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मनोगत व्यक्त केले. तसेच अमृता आरणे, अर्पिता गायकवाड, राम गोडगे, जावेद मुलाणी, दिपाली राऊत या विद्यार्थ्यांनी हृदयस्पर्शी शब्दात मनोगत आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा डॉ गजभिये यांनी आपल्या भाषणामध्ये भारतातील थोर समाजसुधारकांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करून त्यांना समाजसेवेचे महत्व पटवून दिले.
प्राचार्य डॉ एल बी पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजने मधील शिबिर ही आयुष्याची शिदोरी असते हे पटवून देतांना विद्यार्थीदशेमध्ये असतांना यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला एन एस एस चा स्वयंसेवक म्हणून भेट दिल्याच्या आठवणीला उजाळा दिला आणि आयुष्यामध्ये एन एस एस चे संस्कार शिदोरी म्हणून उपयोगी कसे पडतात हे सोदाहरण स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया पवार हिने केले तर अंकिता वाबळे हिने आभार प्रदर्शन केले.