राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे वरकटने येथे आज उद्घाटन संपन्न…
प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यामध्ये स्थापन झालेल्या एकमेव राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा या कंपनी कार्यालयाचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज वरकटने येथे करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी उद्घाटक जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट चे श्रीकांतलाल गीते, जिल्हा विकास व्यवस्थापक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड सोलापूर श्री नितीन शेळके यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे ,पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रतीक गुरव ,वॉटर संस्थेचे सामाजिक विकास अधिकारी विजय पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे म्हणाले की, आपण जळगावची केळी म्हणून ज्या केळीचा उल्लेख करतो ती ओळख खरंतर आता पुसलेली आहे. आता महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण केळी पैकी 60 टक्के केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात होत आहे . सोलापूर जिल्ह्यातील निर्यात होणाऱ्या एकूण केळी पैकी करमाळा तालुक्यातून 70 टक्के केळी एक्सपोर्ट केली जात आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये इंडियन बनाना म्हणून भारतीय केळीची ओळख निर्माण केलेली आहे ती केळी आपल्या करमाळा तालुक्यातील आहे. परंतु याच केळीचे एक्सपोर्ट इतर कंपन्यांच्या माध्यमातून केले जाते. त्याऐवजी आपल्या तालुक्यातील आपल्या शेतकऱ्यांनी स्थापन केलेली हक्काची कंपनी म्हणून राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीचा ब्रँड विकसित करावा आणि त्या ब्रँडच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांनी केळी एक्स्पोर्ट करावी .येणारा भविष्यकाळ हा निश्चितच तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी उज्वल असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्ता पूर्ण मालाचे उत्पादन घेऊन त्याचे योग्य पॅकिंग करून एक्सपोर्ट करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपली गुंतवणूक शेतीमध्ये, शेती प्रक्रिया उद्योगांमध्ये केल्यास त्यातून निश्चितच चांगला परतावा मिळत असतो .त्यासाठी ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होऊन गतिमान होणे आवश्यक आहे. श्री कांतीलाल गीते यांनी केंद्र शासनाच्या 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्या पाठीमागील भूमिका आणि उद्देश व धोरण सांगितले .
श्री गणेश भाऊ करे पाटील यांनी अवघ्या 7 महिने वय असलेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची झेप उत्तुंग आहे . कंपनीने अल्पावधीतच केळी खरेदी बरोबरच एक्सपोर्टचेही धोरण अवलंबिले आहे.येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी सह्याद्री कंपनी प्रमाणे मोठं काम उभा करेल ते काम उभा करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हा विकास व्यवस्थापक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड सोलापूरचे नितीन शेळके सर म्हणाले की ,शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे ,त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना योग्य दिशेने घेऊन जाणे, शासनाचे वेगवेगळे अनुदान उपलब्ध करून देणे हे काम नाबार्डच्या वतीने केले जातात . राजे रावरंभा शेतकरी कंपनीची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. भविष्यकाळामध्ये कंपनीला प्रक्रिया उद्योग उभा करणे ,कोल्ड स्टोरेज उभारणी करणे, पॅक हाऊस उभारणी करणे, माती ,पाणी, परीक्षण प्रयोगशाळा उभारणी करणे आदी उपक्रमांसाठी नाबार्ड कडून जी जी मदत लागेल ती मदत आपण करू असे सांगितले .
या कार्यक्रम प्रसंगी राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीच्या उपस्थित सर्व सभासदांना सकाळ ॲग्रोवन दिनदर्शिकेचे मोफत वाटप करण्यात आले .या दिनदर्शिकामधून कृषी विषयक सल्ला दिला जातो तो सल्ला शेतीसाठी उपयुक्त असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चौगुले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार प्राध्यापक बिबीशन मस्कर यांनी मानले.