जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परिक्षा
ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी
सोलापुर दि. 4 (जि.मा.का) : जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता 6 वी वर्गासाठी 2023-24 वर्षासाठी जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा 2023 चे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 व प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार असल्याची माहिती प्राचार्य, जवाहर नवोदय विदयालय पोखरापूर, तालुका मोहोळ यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे.
नवोदय विदयालयाची सामान्य वैशिष्टये परीक्षेसाठी पात्रता, सविस्तर अधिसूचना इत्यादी परीक्षेसंदर्भाची अधिक माहिती तसेच प्रवेश परीक्षेचे ऑनलाइन अर्ज नवोदय विदयालय समितीच्या https://navodaya.gov.in या वेबपोर्टलवर निःशुल्क भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑफलाइन अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रकातील सूचना, पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावेत. पात्र उमेदवार व पालकांनी ऑनलाइन नोंदणीपूर्वी मुख्याध्यापकाने सत्यापित केलेले विहित नमुन्यातील उमेदवाराचे तपशीलाचे प्रमाणपत्र, फोटो, पालकांची व उमेदवाराची स्वाक्षरी, आधार तपशिल तसेच सक्षम सरकारी अधिकारी यांनी जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रकारचे सर्व कागदपत्रे सॉफ्ट फॉर्ममध्ये तयार ठेवावीत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी प्रवेश अर्जाची प्रिंट घ्यावी.
ऑनलाईन प्रवेशअर्ज भरणेसंदर्भात काही अडचण असल्यास 9579734200 8350956375, 9373856363 या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. सोलापूर जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र विदयार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरुन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विदयालय यांनी केले आहे
00000