
करमाळा प्रतिनिधी
सध्या तालुक्यातील सहकाराचे मंदिर समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चालू असून प्रचार चालू आहे. तालुक्यातील तीन पॅनल या निवडणुकीमध्ये असून बागल गटांनी या निवडणुकीपुरते थांबण्याची भूमिका घेतलेली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आडून बागल गटाला टार्गेट करण्याच्या नादात आदिनाथ चे नुकसान व बदनामी होत असल्याने सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार चर्चेअंती बागल गटाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर आपण

सर्व कार्यकर्ते ठाम आहोत असे दिग्विजय बागल यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या देखील प्रचारादरम्यान आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी ठोस असा कृती कार्यक्रम कुठल्याही पॅनलच्या किंवा गटाच्या वतीने प्रचारादरम्यान सांगण्यात येत नसून अद्यापी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच प्रचाराचा वेळ घालवत असल्याचे दिसून येत आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्या विषयी संपूर्ण तालुक्याला आस्था असून बागल गट देखील या

आस्थेचा आदर करतो परंतु कारखान्याची निवडणूक जिंकण्या करिता ज्या सभा जो प्रचार होत आहे त्यामधून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कर्ज तसेच चालू करण्याची प्रक्रिया आणि त्याच्यासाठी भविष्यात कुठला ठोस कृती कार्यक्रम आखणार आहोत हे अद्यापी कुठल्याही गटाने सभासदांसमोर ठोकपणे सांगितले नसल्याने बागल गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे तसेच बागल गटाने अजून कोणालाही पाठिंबा दिला नसून कुणी जर पाठिंब्या विषयी वक्तव्य करत असेल तर ती अफवा आहे असे समजावे तसेच बागल गटाला मानणाऱ्या बागल सर्व सभासद व कार्यकर्ते यांनी देखील याची नोंद घ्यावी व सर्वांच्या विचाराने सर्वानुमते योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल याची नोंद घ्यावी. निर्णय केला जाईल तोपर्यंत कार्यकर्त्यांनी तटस्थ रहावे असे आवाहन देखील दिग्विजय बागल यांनी केले आहे.