करमाळा प्रतिनिधी

पाच वर्षांपूर्वी शहरातील सुतार गल्ली भागातील राजपूत समाजाच्या गृहिणींनी मिळून राजपूत स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या माध्यमातून झालेली बचत, कर्ज पुरवठा आणि व्याजाच्या रूपात मिळालेला परतावा यामुळे या महिलांना आर्थिक लाभासह स्वतःच्या पायावर उभे राहून संसाराला हातभार लावण्याची नवीन प्रेरणा मिळाली आहे.

दरमहा प्रत्येकी तीनशे रुपये बचतीचे उद्दिष्ट ठेवून एकूण 20 महिलांनी हा बचत गट सुरू केला. गटातील गरजू महिलेला 13500 रुपयांचे पहिले कर्ज वाटप करण्यात आले यानंतर बचत वाढीच्या प्रमाणात क्रमाक्रमाने सर्व महिलांना साधारणतः दहा लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. प्रति महिना केवळ तीनशे रुपये अशी किरकोळ बचत करून प्रत्येक महिलेची पाच वर्षात प्रत्येकी 17500 बचत जमा झाली आहे. याशिवाय कर्जावरील व्याजाच्या स्वरूपात प्रत्येक महिलेला 16,400 रुपये मिळाले आहेत.

या गटातील कर्ज बचत आणि व्याजाच्या परताव्याचा उपयोग महिलांनी स्वतःच्या गरजेच्या वस्तूंसह व पतीच्या व्यवसायासाठी मदत केली आहे. याशिवाय या गटातील अश्विनी सोमचंद्र परदेशी, भावना ऋषिकेश परदेशी आणि उर्मिला सुनील परदेशी या महीलांनी अनुक्रमे चायनीज सेंटर, ब्युटी पार्लर आणि शेवई मशीनचा स्वतःचा गृह उद्योग सुरू केला आहे.

………………………….

गटातील सर्व महिलांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली. आमच्या बचत गटाच्या माध्यमातून समाजातील महिलांनी आर्थिक मदतीसह महिन्यातून एकदा एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा अनुभवही घेता आला. या बचत गटामुळे छोट्या बचतीचे महत्त्व सर्वांना कळाले असून लवकरच आम्ही नवीन बचत गटाची सुरुवात करणार आहोत – वंदना परदेशी सचिवा, राजपूत महिला बचत गट करमाळा.

………………………….

राजपूत बचत गटाच्या माध्यमातून मी चेतना मेक ओव्हर या नावाने माझ्या स्वतःच्या ब्युटी पार्लरची सुरुवात केली आहे. त्यामुळे मला रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे. आमच्या या बचत गटामुळे इतर महिलांनाही स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळते आहे – भावना परदेशी संचालिका, चेतना मेक ओव्हर

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *