
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिकेने शहरात सफाई कामगार पुरवठा करण्याचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला दिला असून या कंपनीला एका सफाई कामगारांसाठी प्रतिदिन 619 अकुशल कामगारांसाठी व कुशल कामगारांसाठी 679 रुपये प्रति दिन पगार दिला जातो मात्र संबंधित कंपनी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना केवळ प्रतिदिन 330 रुपये पगार देते. या व्यवहारातून रोज 15 हजार रुपये हा ठेकेदार कमवत असून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दमदाठीभाषा करीत आहे अशा उर्मट ठेकेदाराचे नगरपालिकेकडे असलेले दहा लाख रुपये डिपॉझिट जप्त करून या रकमेतून रोजंदारीवरील प्रकार कर्मचाऱ्यांची तीन महिन्याचे पगार प्रतिदिन 619 रुपये अदा करावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

करमाळा नगरपालिकेत 53 कंत्राटी सफाई कामगार आहेत. हे सर्व बौद्ध समाजाचे असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काही दिवसावर आली असताना संबंधित ठेकेदारांनी गेली तीन महिन्यापासून यांचा पगार केलेला नाही. 619 रुपये नगरपालिके कडून घेऊन फक्त कामगारांना 330 रुपये ठेकेदार देतो परत तीन-तीन महिने पगार देत नाही. हा मस्तवाल ठेकेदार नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा उलटा बोलतो, पत्रकारांचे फोन उचलत नाही, कामगारांनी फोन केला तर त्यांना उडवा उडवी उत्तरे देऊन दमदाठीची भाषा करतो, त्यामुळे या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

…………………..
आम्हाला भारतरत्न डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सवासाठी पैशाची गरज आहे. ठेकेदार पगार करत नाही. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सफाई कामगाराला किमान 530 रुपये प्रतिदिन वेतन मिळणे अपेक्षित आहे. मात्र सफाई कामगारांच्या घामाच्या कष्टावर दलाली खाणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालू नये अशी मागणी रमेश भारत कांबळे, बाळनाथ ज्ञानदेव कांबळे, संतोष हरिबा कांबळे, सुनील शंकर खरात, नवनाथ बन्सी कांबळे या सफाई कामगारांनी केली आहे.
………………….
संबंधित ठेकेदाराचे दहा लाख रुपये डिपॉझिट असून डिपॉझिट जप्त करून त्या रकमेतून सर्व सफाई कामगारांचे केंद्र सरकारच्या किमान वेतन दराप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांची पगारी दोन दिवसात करू – सचिन तपसे मुख्याधिकारी करमाळा नगरपालिका