
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. सुजाता भोरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श व कृतिशील शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती.

प्रा.भोरे यांनी गेल्या २० वर्षांपासून अभ्यासक्रमात नवनवीन संकल्पना विकसित केल्या असून स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, जनजागृती रॅली, सेंद्रिय शेती, जलसंधारणाची कामे, फटाके मुक्त अभियान, मतदान जनजागृती, एड्स जनजागृती रॅली अशा सामाजिक उपक्रमात त्या सक्रिय सहभाग घेतात. तसेच गेली १७ वर्ष एन.एस.एस.च्या माध्यमातूनही स्वच्छता मोहीम, हागणदारी मुक्तीची गुढी, डास मुक्त गाव अशा संकल्पना राबविण्यात त्यांनी भरघोस कार्य केलेले आहे. याबद्दल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने त्यांना सोलापूर येथे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सेवा फाउंडेशनचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप, सचिन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

या पुरस्काराबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व यशवंत परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.