
करमाळा प्रतिनिधी
मकर संक्रातीच्या निमित्त सर्व महिला हळदी कुंकवाला एकत्र जमतात. एकमेकींना गृहपयोगी वस्तू खाद्यपदार्थ, स्टीलची भांडी वाण म्हणून एकमेकींना देतात. परंतु जि. प. प्रा.शाळा वैद वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका आदर्श व उपक्रमशील शिक्षिका प्रफुल्लता बाबासाहेब सातपुते-थोरात यांनी वाचन चळवळ विकसित व वृद्धिंगत होण्यासाठी, प्रत्येकाला वाचनाची

आवड निर्माण होण्यासाठी विचारांचा वाण लुटला आहे. त्यांनी प्रत्येक महिलेला एक पुस्तक भेट म्हणून दिले. या पुस्तकांमध्ये विचार प्रवाह, दर्पण, मंथन, शिंपल्यातील मोती, परमार्थिक विवेचन, संस्कारधन, फुलोरा, इत्यादी पुस्तकांचा समावेश होता. वाचनाने माणूस घडतो. स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो, वाचनाने तणाव कमी होतो, वाचन सर्जनशील बनविते, स्मरणशक्तीचे रक्षण करते, आनंदी बनविते, आकलन क्षमता व विचारशक्ती विकसित करते. वाचनाचे अनेक फायदे आहेत.

जसे संत रामदास स्वामींनी म्हटलेले आहे “दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचत जावे” ही वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचा हा उपक्रम दहा वर्षापासून चालू आहे. आत्तापर्यंत 1000 पुस्तके वाण म्हणून भेट दिली आहेत. या उपक्रमाचे महिला वर्गातून भरभरून कौतुक होत आहे.