करमाळा प्रतिनिधी
करमाळा माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी, मागितलेली माहिती तात्काळ देण्यात यावी तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी शिक्षक भारती च्या वतीने गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ पासून “आमरण उपोषण” करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर येथील भ्रष्टाचार व कार्यालयीन दफतर दिरंगाई याला संघटनेने वारंवार विरोध केलेला आहे. यासाठी संघटनेने वेळोवेळी माहिती अधिकाराखाली माहितीची मागणी केलेली आहे. वारंवार अर्ज, अपिल करूनही संबंधित विभागातील लिपीक
माहिती देत नाहीत, महिनो महिने अधिकारी सुनावण्या ठेवत नाहीत, माहिती दडविली जाते. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असतानाही माध्यमिक शिक्षण विभागाकडून काहीही कार्यवाही केली जात नाही. मा. राज्य माहिती आयोग, खंडपीठ पुणे यांनी आदेश देवूनही माहिती दिली जात नाही. यामुळे मागील चार वर्षात वेळोवेळी मागितलेल्या माहिती अधिकार अर्जानुसार तात्काळ माहिती देण्यात यावी, जाणीवपुर्वक माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ करण्याऱ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ पासून पूनम गेट, जिल्हा परिषद, सोलापूर येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांनी दिली.
सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागात संघटने कडील माहिती अधिकाराची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. जन माहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांनी जाणीवपूर्वक माहिती दडवली आहे. कायद्यानुसार राज्य माहिती आयोगाकडे अपील करून सुद्धा माहित दिलेली नाही. माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केल्यापासून राज्य माहिती आयोगाकडे निकाल लागेपर्यंत तीन चार वर्षांचा कालावधी जातो. याच गोष्टीचा गैरफायदा माहिती दडवण्यासाठी होताना दिसून येत आहे. माहिती जाणीवपूर्वक दडवणाऱ्या जन माहिती अधिकार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित केले तरच माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते – विजयकुमार गुंड जिल्हा प्रवक्ता शिक्षक भारती सोलापूर