करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला असून यामध्ये महिलांसाठी खास योजना राबविण्यात आल्या असून 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या अंतर्गत दरमहा दीड हजार रूपये खात्यावर जमा होणार असल्याने शिवसेना प्रवक्त्या तथा सचिव मनिषाताई कायंदे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या वतीने महिलांना साखर वाटून शासनाच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी गायकवाड म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकाभिमुख निर्णय घेत असून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. या आगोदरही शिंदे सरकारच्या कालावधीत महिलांना एस.टी. तिकीटामध्ये 50 टक्के सूट देण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजना राबविलेली असून मुलींचा जन्मदर वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. तसेच आताच्या अधिवेशनात 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रूपये देण्याचा निर्णय घेतल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सदर अर्थसंकल्पातून महिलांना रिक्षा व्यावसायासाठी मदत केली जाणार आहे तर 52 लाख कुटूंबांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार असून दहा लाख युवकांना दरमहा 10 हजार विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा व त्याला वारकरी सांप्रदायाची असलेली जोड विचारात घेता शासनाने मुख्यमंत्री वारकरी सांप्रदाय महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून वारीतील मुख्य पालख्यातील दिंडयांना प्रतिदिंडी 20 हजार रूपये देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गायकवाड यांनी उपस्थित महिलांना दिली.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री शिंदे घेत असलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता समाधानी आहे तर विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे. वास्तविक पाहता, विरोधकांनी जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करणे अपेक्षित आहे परंतु विरोधासाठी विरोध म्हणून नाहक वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. परंतु जनता सुज्ञ असल्याने विरोधकांच्या वलग्नांना बळी पडणार नाही व मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा आत्मविश्वास सुध्दा यावेळी गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख गिता हेंद्रे, उप शहर प्रमुख रूपाली शिंदे, शाखा प्रमुख मनिषा कारंडे, डॉ.मोटे, भक्ती गायकवाड, भारती लष्कर, मंजिरी जोशी, पठारे, उबाळे, ज्योत्सना बुदगे, भारती लष्कर, मंगल वडे, आदि पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.