करमाळा प्रतिनिधी
‘श्रीराम जय राम जय जय राम’चा मुखी अखंड नामजप करत मजल दरमजल करत १४ दिवसांत सावडी (ता. करमाळा) येथील रामभक्तांनी सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास केला. रामभक्तांनी दि. १७ एप्रिल रोजी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.
करमाळ्यात रामभक्तांचे रविवारी भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. सावडी येथे श्री एकनाथ भावार्थ रामायण सुरू आहे. त्या अनुषंगाने सावडीतील ३५ रामभक्त १४ दिवसांच्या वनवासासाठी पैठणला गेले होते. तेथून परतत असताना
रविवारी करमाळ्यात सुवासिनींनी आरती करून औक्षण केले. शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दि. ३० रोजी सावडीत ग्रामस्थांच्या वतीने वनवासास गेलेल्या रामभक्तांचे भक्तिपूर्ण वातावरणात आरती करून स्वागत करण्यात येणार
आहे. १४ दिवस उपवास अन् अनवाणी मार्गक्रमण वनवासाला गेलेल्या मंडळींचा १४ दिवस उपवास असतो. मजल दरमजल करत जाताना रात्री त्या-त्या गावातील हनुमान मंदिरात मुक्काम करायचा. रामभक्तीचा जागर करायचा. सकाळी उठून पुढे मार्गस्थ व्हायचे. सर्व भक्तांचा उपवास असतो.
……………………….
श्री एकनाथ भावार्थ रामायणास ४ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात करण्यात आली आहे. तर या रामायणाच्या अनुषंगाने गावातील रामभक्त १७ एप्रिल रोजी पायी वनवासासाठी निघालेले होते. तर ते ३० एप्रिल रोजी सावडीत पोहोचतील. ४ डिसेंबरपासून गावात रोज रामायणाचे वाचन आणि निरूपण सुरू आहे. तर लक्ष्मण शक्ती सोहळ्याने याची सांगता होईल – भाऊसाहेब शेळके, सावडी.
……………………………..
तीन वर्षांपासून आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून १४ दिवसांचा वनवास पूर्ण करतो. प्रत्येक वर्षी सहभागी झाल्यामुळे यामध्ये रामभक्तीचा वेगळा आनंद मिळतो. तर संपूर्ण तीन ते चार महिने गाव राम भक्तीत तल्लीन असते – उत्तम देशमुख, ज्येष्ठ भक्त
…………….
रामभक्तांनी विणेकरी, टाळकरी आणि गळ्यात रामाची प्रतिमा घालून प्रवासात सावडीतील ३५ भक्तांनी सुरुवात केली. पैठणच्या मार्गावर जाताना आणि येताना ठिकठिकाणी स्वागत केले. राहण्याची व्यवस्था केली. असा प्रवास करत पायी वनवास यात्रा रविवारी करमाळ्यात पोहोचली. ३० एप्रिल रोजी सावडीत लक्ष्मण शक्ती सोहळा होणार आहे.