करमाळा प्रतिनिधी
इ. 12 वी आणि इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा असल्यामुळे हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा ते हनुमान मंदिर पर्यंत काढण्यात आला.
श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिल मिळण्यासाठी दि. 29 फेब्रुवारी रोजी करमाळा
बंद व तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु सध्या इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सुरू आहे. त्याच परिसरात तत्कालीन चेअरमन यांचे घर आहे. तसेच परीक्षा केंद्रावर कलम 144 आदेश असल्यामुळे तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर मोर्चा व करमाळा बंदचे आवाहन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा ते हनुमान मंदिर, सावंत गल्ली पर्यंतच काढण्यात आला होता, अशी माहिती मकाई संघर्ष समितीने सांगितली आहे.
यावेळी ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर, रवींद्र गोडगे, राजेश गायकवाड सर, शहाजीराजे माने, हरिदास मोरे, गणेश वाळुंजकर व शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
यापूर्वी बोंबाबोंब आंदोलन व थू थू आंदोलन, भजनी मंडळ, बैलं, कोंबड्या, गाढवं आणत ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले. यादरम्यान शेतकऱ्यांना ऊस बील देऊ आणि सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन वेळोवेळी देण्यात आले होते. परंतु
शेतकऱ्यांना ऊस बील अजूनही मिळाले नाही. आणि मार्गदर्शन ही मिळाले नाही व कोणावरही कारवाई झाली नाही. म्हणून दि. 29 फेब्रुवारी रोजी पोथरे नाका ते हनुमान मंदिर, सावंत गल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आणि येथे आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे व तहसील चे पुरवठा अधिकारी जाधव यांनी निवेदन स्वीकारले.
शेतकऱ्यांना थकीत ऊस बील 15 % व्याजासहित मिळावे. तसेच सन 2021- 2022 आणि 2022- 23 या गाळप हंगामातील 159335 मे. टना पासून झालेली साखर पोती , बगॅस, मोलॅशीस विक्री या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि जबाबदारी निश्चित करून कारखाना आणि तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या खाजगी मालमत्ता वर बोजा चढवण्यात यावा. तसेच ज्या ज्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना ऊस बील देण्यासाठी आणि आर आर सी ची कारवाई करण्यासाठी दफ्तर दिरंगाई व विलंब केला. टाळाटाळ केली त्यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी.
अन्यथा जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बील मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. आणि भविष्यात आता यापेक्षा अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, रामदास झोळ सर, रवींद्र गोडगे यांनी दिला.
चौकट : – तहसील चे पुरवठा अधिकारी जाधव यांनी बोलताना सांगितले की, काल तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी श्री. मकाई कारखान्यावर आर आर सी ची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून ती कारवाई लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याजासहित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करू असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच यावेळी चिमुकली कु. जान्हवी राहुल सावंत हिने मनोगत व्यक्त केले.