करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील स्नेहालय इंग्लिश स्कूल मध्ये मराठी राजभाषा गौरवदिनानिमित्त साहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव लिखित छोटुली सिआरा या बालकाव्य संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बालरोगतज्ञ डॉ. वर्षा करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या की, अशा
बालसाहित्याची आज खरी गरज आहे. संग्रही ठेवावा असा हा काव्यसंग्रह आहे. कुठल्याही कार्यक्रमात शाल श्रीफळ, भेटवस्तू ऐवजी पुस्तके भेट देऊन आपण वाचन संस्कृती वाढवली पाहिजे.
स्नेहालयातील ऊसतोडणी कामगारांची मुले(ओम शंकर वाघ, प्रविण शंकर वाघ)कोरोना मध्येवडील गमावलेली मुले ( राहत अली इक्बाल शेख,स्वरांजली जाधव)तसेच शाळेतील ( लीला गणेश करे पाटील, श्रावणी सागर कांबळे, समृद्धी कांबळे, साद
घोडके, श्रेयस पवार,)इ.विद्यार्थ्यांच्या हस्ते बालकाव्य संग्रहाचे प्रकाशन झाले.
प्रमुख उपस्थिती मध्ये असलेल्या मा.एलिझाबेथ आसादे मनोगतात म्हणाल्या की मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आणि मनोरंजन व ज्ञानवृध्दीसाठी अशा साहित्याची गरज आहे.
सामाजिक कार्यकर्त्या शितल करे पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बडबड गीतातून नकळतपणे मुलांवर संस्कार रुजवले जातात.पालकांनी पुस्तके विकत घेऊन मुलांना अवांतर वाचनाची सवय लावायला हरकत नाही.
स्नेहालयाच्या सचिव धनश्री दळवी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांसमोर असे साहित्यिक आणणे आणि त्यांच्या समोर अशा साहित्याचे प्रकाशन होणे ही काळाची गरज वाटते. बालसाहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव यांच्या कवितांचे वाचन आम्ही विद्यार्थ्यांकडून सदैव करुन घेत असतो.
शेताच्या बांधावर निसर्गाच्या सान्निध्यात व अवांतर खर्चाला कात्री मारत माझ्या नातीच्या नावाचं शीर्षक देऊन छोटुली
सिआरा हा माझा बालकाव्य संग्रह मी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशित केला. तसेच ऊस तोडणी कामगारांची मुलं आणि कोरोना काळात आईवडील गमावलेल्या छोट्या दोस्तांना सदर पुस्तक मी प्रेम पूर्वक अर्पण केले आहे. निर्मला पब्लिकेशनचे मठपती दादा यांनी या पुस्तकांसाठी मनापासून मेहनत घेतली. तसेच बालसाहित्यातलं नावाजलेलं नाव व महाराष्ट्र शासन पुरस्कृत
मुंबईचे एकनाथ आव्हाड यांची प्रास्तावना या पुस्तकास लाभली व विकी परदेशी नायब तहसीलदार पुणे यांचे शुभेच्छा पत्र लाभले याचा मला मनस्वी आनंद होतोय-अंजली राठोड श्रीवास्तव.
सदर प्रकाशनासाठी डॉ कविता कांबळे, जयश्री वीर ,उषा बलदोटा, पुष्पा लुंकड,सुरेखा घाडगे,यादव भगिनी, ज्योती पांढरे,रेशमा जाधव, सुप्रसिद्ध साहित्यिक दंगलकार नितीन, कवीवर्य प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर, कवयित्री सुलभा खुळे, विजयालक्ष्मी गोरे,
संजीवनी राजगुरू, मंजू जोशी, रत्नमाला होरणे, मितवा श्रीवास्तव अग्रवाल तसेच सर्व पत्रकार बंधू इ.नी प्रकाशनासाठी शुभेच्छा दिल्या