करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच संभाव्य चारा टंचाई व पाणी टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना मदत, तलावातील गाळ काढणे आदींचा आढावा घेण्यासाठी
आमदार संजयमामा शिंदे यांनी तहसील कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत संभाव्य दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली असून आवश्यक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवा, मीही सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
करमाळा तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. ३१) झालेल्या बैठकीवेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, समाधान घुटुकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, कृषी अधिकारी संजय वाकडे, प्रभारी गटविकास
अधिकारी राजाराम भोंग, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, वामनराव बदे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, अॅड. राहुल सावंत, विवेक येवले आदी उपस्थित होते.
पाऊस लांबल्यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. या बैठकीत तलावातील गाळा काढण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्यासाठी शेतकऱ्यांनाही आवाहन करण्यात आले आहे. टँकर सुरु करण्याची वेळ आल्यास
पाणी भरण्यासाठी ठिकाणे निश्चीत करा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली आहे. याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन कसे करता येईल, यावरही यावेळी चर्चा झाली. नागरिकांना रोजगार कसा मिळाले त्यासाठी काय कामे केली पाहिजेत, पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसी करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.