करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 ता. करमाळा या शाळेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
29 ऑगस्ट अर्थात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने खातगाव नंबर 2 या शाळेनेही हा दिवस मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांना विविध खेळांचा आनंद देत साजरा केला.
शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आतच मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यावर या शाळेचा नेहमी भर राहिलेला आहे. केवळ पहिली ते चौथी पर्यंत शाळा असून सुद्धा शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आकर्षक आणि मोजमापासह मैदानाची आखणी केली.
विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी तसेच निरोगी आणि तंदुरुस्त शरीराचे महत्त्व पटावे म्हणून विद्यार्थ्यांच्या कबड्डी, लंगडी अशा वेगवेगळ्या सांघिक स्पर्धांचे आयोजन केले. मुलांच्या संघांना चंद्रशेखर आझाद, भगतसिंग ही नावे दिली तर मुलींच्या संघाला सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी महापुरुषांची नावे दिली. विजयी तसेच उपविजयी संघांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. एवढेच नाही तर शिक्षकांनीही प्रत्यक्ष खेळात सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देत शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन केले.
तसेच आपल्या जिभेचा आणि चवीचा विचार न करता शरीरासाठी आवश्यक असणारा आहारच आपण घेतला पाहिजे हे पटवून देत कॅल्शियम तसेच प्रोटीन युक्त आहार असणाऱ्या राजगिरावड्यांचे वाटप केले. एकूणच या दिवसभरात विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान तर मिळवलेच शिवाय खेळांचा मनसोक्त आनंदही लुटला.
हा उपक्रम प्रभावी रित्या राबविल्याबद्दल करमाळ्याचे bdo मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील तसेच शि.वि.अ. वीर तसेच नलवडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्णा अविनाश मोरे, शा. व्य. स. चे अध्यक्ष संतोष झेंडे आणि समस्त ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे तसेच उपशिक्षक किरण जोगदंड यांचे भरभरून कौतुक केले.