करमाळा प्रतिनिधी
मांगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून या भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून मागच्या अंजनडोह येथील नरभक्षी बिबट्याच्या हल्याच्या कटू आठवणी ताज्या असून त्यामूळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली आहे.
सदर घटनेची तातडीने गंभीर दखल घेऊन सोलापूर वन विभाग अधिका-यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इ-मेल द्वारे संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे.
मोहोळ आणि सोलापूर येथील वन अधिकारी यांनी नागेश बागल यांच्या वासरावर हल्ला केला त्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दिग्विजय बागल यांनी वनपरिक्षेत्रपाल लटके आणि त्यांच्या सहकारी अधिका-यांशी चर्चा करून पिंज-यांची संख्या वाढवावी, तसेच ड्रोण द्वारे बिबट्याचा शोध घेऊन ग्रामस्थांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
त्याचबरोबर ग्रामस्थांनीही घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील दिग्विजय बागल यांनी केले. यावेळी वन अधिका-यांकडून देखील नागरीकांना खबरदारीच्या सूचना केल्या. यावेळी मशाल, काठी वापरावी, रात्री विनाकारण बाहेर पडू नये अशा प्रसंगी धैर्याने तोंड द्यावे अशा सूचना केल्या. त्याचबरोबर दिग्विजय बागल यांनी शेतक-यांची नुकसानभरपाई देण्याची देखील मागणी केली असता लवकरच तसा प्रस्ताव पाठवू असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यावेळी मांगी ग्रामस्थांसोबत अमित बागल, किशोर बागल, अभिजीत बागल, स्वतः नागेश बागल, डॉ. धनराज देवकर, तात्या बागल, पोलीस पाटील आकाश शिंदे तसेच तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.