मुंबई प्रतिनिधी

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत गेली एक वर्षापासुन रणजितसिंह मोहिते पाटील करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असुन आ.मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेत केलेल्या मागणीनुसार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवुन केलेल्या पत्र व्यवहारानंतर कृषीमंत्र्यांनी तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना आपल्या विभागाला दिल्या आहेत.

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानषरिषदेत उपस्थित केलेल्या चर्चेनंतर सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव(वां) ता.करमाळा येथिल कृषी विभाग महाराष्ट्र शासन फळरोपवाटिका (गट नं.१०० ते १०८) व महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कोरडवाहू संशोधन केंद्र (गट नं.११०, १११ व ११२/३) अशा एकूण सुमारे १०० एकर जागेपैकी उपलब्ध जागेत केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी त्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी आ.मोहिते पाटील यांच्या पत्रावर दिलेल्या प्रतिसादानंतर जळगाव, नांदेड नंतर सोलापुर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रात केळी पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असुन सद्या सुमारे १.१८ लाख हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. देशात जवळपास ३ कोटी टन केळी उत्पादन दरवर्षी होते त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा १४% आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक निर्यातक्षम केळीचे उत्पादन होते. सद्यस्थितीत सोलापुर जिल्ह्यात केळी लागवडीखालीत क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली असुन सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे.

केळी निर्यातीच्या दृष्टीकोनातुन विचार करता देशाच्या एकूण केळी निर्यातीपैकी १ लाख ६३ हजार टन केळीची निर्यात महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्रातील एकुण केळी निर्यातीपैकी ५०%  निर्यात सोलापुर जिल्ह्यातुन होते. गेल्या वर्षी महाराष्ट्रातुन सुमारे २४ हजार कंटेनर केळी एक्सपोर्ट झाली यातील सुमारे १२ हजार कंटेनर सोलापुर जिल्ह्यातुन एक्सपोर्ट झाली आहे.

महाराष्ट्रात केळी पिकावर संशोधन करणारे केळी संशोधन केंद्र जळगाव आणि नांदेड येथे कार्यरत आहे. या केंद्रांच्या माध्यमातुन केळी उत्पादक शेतक-यांना अनेक संशोधनपर महत्वाच्या शिफारशी देऊन एकूण विक्रमी केळी उत्पादनात मोलाचा वाटा उचललेला आहे.

सोलापूर भागातील हवामान, मृदापरीक्षण, केळीच्या विविध वाणांचा संग्रह करून अभ्यास करणे, केळी लागवडीसाठी संपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणे, केळींसाठी लागणा-या अन्नद्रव्यांची मात्रा ठरविणे, केळी पिंकावरील रोग व किंडींचे व्यवस्थापन, शिक्षण आणि प्रशिक्षण यादृष्टीने अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी शेलगाव ता.करमाळा येथे केळी संशोधन केंद्र होणार असल्याने शेतकऱ्याच्या वतीने आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

चौकट

सोलापुर जिल्ह्यात केळीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. येथील उत्पादकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वाव आहे. त्यादृष्टीने केळी संशोधन केंद्र स्थापन व्हावे, यासाठी गेल्या वर्षापासुन मी सातत्याने मागणी करत असुन ती पुर्णत्वाकडे जात आहे. कृषी मंत्र्यांबरोबर चर्चा झाली असुन तत्काळ प्रस्ताव मागवला आहे. प्रस्ताव मंत्रालयात आला तरी केळी संशोधन केंद्राची उभारणी झाले शिवाय माझा पाठपुरावा थांबणार नाही – आ.रणजितसिंह मोहिते पाटील

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *