सोलापूर दि.1 (जि.मा.का.) : सोलापूर ग्रामीण जिल्हयात अपघातांचे प्रमाण वाढले असून सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत घडत असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापूर ते पूणे व राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 सोलापूर ते विजापूर या महामार्गावर होणारे अपघात व अपघातातील मृतांची संख्या कमी होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आावश्यक होते.
त्याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षक यांचे आदेशाप्रमाणे सोलापूर पुणे महामार्गावरील सोलापूर ते शेटफळ , शेटफळ ते भिमानगर तसेच सोलापुर ते विजापूर या महामार्गावरील व्हनसळ फाटा ते नांदणी टोलनाका या दरम्यान विशेष पथक नेमून सायं. 05 ते रात्री 10 वाजेपर्यंत नाकाबंदी व महामार्ग गस्त करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक अशोक सायकर यांनी दिली.
या गस्ती दरम्यान महामार्गावर नोपार्किंग , विरूध्द दिशेने वाहन चालविणे , विना टेल लँम्प , विना रि फलेक्टर तसेच हायवेवर दोन्ही बाजूस थांबलेल्या वाहनांवर एम व्ही ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात येत असून केलेल्या कारवाईचा अहवाल नियंत्रण कक्षामार्फत घेण्यात येत आहे. दि. 28 जुलै पासून अशा एकुण 25 कसुरदार वाहन चालकांवर कारवाई करण्यात
आली असून त्यांचे कडून 26 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष मोहिम दरम्यान म्हणजे 28 जुलै पासून आजतागायत सायंकाळी 5.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत उपरोक्त राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सोलापूर ग्रामीण जिल्हयातील वाढत्या अपघातांना प्रतिबंध करणे कामी विशेष मोहीम अशीच पुढे चालू ठेवण्यात येणार आहे, असे श्री. सायकर यांनी सांगितले.