सोलापूर, दि.28(जिमाका):-जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत सविस्तर माहिती घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.

            पोलीस अधीक्षक यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक सरदेशपांडे मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क अध्यक्ष नितीन धार्मिक, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कांबळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल थडसरे, स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, श्वान पथक चे पोलीस उपनिरीक्षक भारत मस्के व टपाल विभागाचे जे. आर. नरुटे आदी उपस्थित होते.

              पोलीस अधीक्षक सरदेशपांडे पुढे म्हणाले की समितीच्या सदस्यांना यापूर्वीच जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी तालुक्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यानुसार समिती सदस्यांनी संबंधित पोलीस ठाण्याची मदत घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयात अंमली पदार्थाच्या दुष्परिणाबाबत जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व 25 पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सामान्य रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर कडून सविस्तर मार्गदर्शन करण्याबाबत नियोजन करावे. जेणेकरून पोलीस विभागालाही या अनुषंगाने शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन करणे सोयीचे होईल, असेही त्यांनी सुचित केले.

      कृषी विभागाने पिक पाहणीच्यावेळी जिल्ह्यात गांजा व खसखस पिकांची लागवड झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत पोलीसांना माहिती दयावी . तसेच कृषी सहाय्यकाला गावात उपरोक्त पिकांच्या अनुषंगाने लक्ष ठेवण्यास सांगावे. टपाल विभागाने सोलापुर व पंढरपुर यांनी पार्सल चेकींगवेळी काही संशयास्पद आढळले तर पोलीसांची मदत घेऊन पुढील योग्य ती कारवाई करावी. तसेच सिमा शुल्क विभागाने मोठया प्रमाणात इम्पोर्ट व एक्सपोर्ट होणारे कंपन्यांना व्हीजीट करावी तसेच अंमली पदार्था संदर्भात माहीती मिळून आल्यास ती पोलीसांना त्वरित कळवावी, अशा सूचना श्री. सरदेशपांडे यांनी केल्या.

             जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी त्यांचे स्टाफमार्फत सोलापुर ग्रामीण जिल्हयातील अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांवर उपचार करुन तसेच त्यांना समुपदेशनातून अंमली पदार्थापासून परावृत्त करावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापुर ग्रामीण जिल्हयातील नोंदणीकृत परमीट रूम, बिअरबार, देशी

विदेशी दारू दुकाने इ. ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री होत आहे याबाबत माहिती काढुन घेवुन त्यांचेवर कारवाई करावी. तसेच माहिती विभागाने अमली पदार्थाच्या दुष्परिणाम बाबत जनजागृती करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. सरदेशपांडे यांनी केले.

             जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी मध्ये आजारी उद्योगांची माहिती मागून घ्यावी तसेच त्यांची नियमित तपासणी करावी.  एमआयडीसीचे अधिकारी या समितीच्या बैठकीला नियमित उपस्थित राहावेत, असे अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कांबळे यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *