महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार आदर्श शिक्षिका मनीषा हरिचंद्र पेठकर यांना प्रदान
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी तालुका करमाळा येथील पदवीधर शिक्षिका मनीषा हरिचंद्र पेठकर (बाभळे) यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते व बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे यांच्या उपस्थितीत 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी पोलीस मुख्यालय
सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपयाचा चेक, सन्मानपत्र, आकर्षक ट्रॉफी, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. सदर पुरस्कार महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने मंत्रालयाच्या वतीने देण्यात येतो. गेल्या 30 वर्षापासून मनीषा हरिचंद्र पेटकर यांनी महिला व मुलींच्या शैक्षणिक सामाजिक
आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबवून महिला व मुलींचे सक्षमीकरण केले आहे. महिला मेळावे घेऊन महिला व मुलींसाठी असणारे कायदे त्यांचे फायदे यांची माहिती देणे, किशोरी मेळावे घेऊन किशोर अवस्थेतील समस्या व उपाय मासिक पाळी विषयाच्या अंधश्रद्धा दूर करणे तसेच मनोरंजनातून महिलांना लघु उद्योगाचे प्रशिक्षण देणे, विधवा व सर्व महिलांचे
हळदी कुंकू कार्यक्रमातून उद्बबोधन करणे, बेटी बचाओ बेटी पढाओ नाट्यीकरणातून प्रबोधन करणे, स्त्रीभ्रूणहत्यांना मार्गदर्शन करून प्रतिबंध करणे, किशोर वयातील मुलींना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगणे, आंतरराष्ट्रीय महिला दिनात सर्व महिलांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण देणे, महिला व मुलींना गृह कौशल्य जीवन
कौशल्य व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे अशा विविध कार्यामुळे मनीषा पेटकर यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, केंद्रप्रमुख चंद्रहास चोरमुले सर, मुख्याध्यापक साबळे सर, जिल्ह्यातील शिक्षक, पत्रकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील जाधव, पोंधवडी येथील ग्रामस्थ व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले.