जगदाळे यांचे सर्व आरोप बालिश बुध्दीचे व बिनबुडाचे- चेअरमन धनंजय डोंगरे
करमाळा – श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमध्ये आपण एक रुपयांचा भष्टाचार केला नसून याउलट तळमळीने पुणे, मुंबई सह अनेक ठिकाणी पदर पैसे घालवून आपल्या तालुक्याचे वैभव असणारा श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्वावर राहावा म्हणून प्रयत्न केले आणि त्याला यश आले. आज रोजी आपला कारखाना सर्व शेतकरी व वाहतूकदारांना रोखीने पैसे देणारा महाराष्ट्रातील पहिला कारखाना ठरलेला आहे.
नितीन जगदाळे हे सर्व प्रथम बागल गटातून संचालक म्हणून आमच्या सोबत निवडून आले, नंतर पाटील गटाकडे गेले. जे काही कारखान्यांचे निर्णय असतात त्यामध्ये सर्व संचालक मंडळाची मान्यता असते, होणारा प्रत्येक निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीशिवाय होत नसतो. जगदाळे हे प्रत्येक बैठकीमध्ये उपस्थित होते, त्यांना सह्याचे अधिकार ही कारखान्यांने दिलेला आहे, त्यामुळे कोणताही निर्णय, खरेदी-विक्री होत असताना त्यांची सही घेतली जाते. ते अधिकृत कारखान्याचे
जबाबदार व्यक्ती आहेत. असे असताना ही जगदाळे यांनी कारखाना पंपावरुन कारखाना कर्मचारी यांना दमदाटी आणि शिवीगाळ करुन वेळोवेळी डिझेल घेत होते, त्याबाबत त्यांना जाब विचारला असता तसेच स्वतःच्या भावाच्या नावावर गाळपास येणाऱ्या उसावरती पाच लाख रुपये कारखाना बंद काळात अँडव्हान्स उचलून एक रुपया ही अजून कारखान्याकडे जमा केला नाही, याबाबत वेळोवेळी मागणी केली असता त्याचा मनात राग धरून त्यांनी असे हीन आरोप करण्यास सुरुवात केली आहे. कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी हे संचालक मंडळाच्या सूचनेनुसार व आदेशानुसार नियमानुसार कामकाज करत असतात त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर्ती मुद्दाम आरोप करून जगदाळे यांनी त्यांना कारखाना कामकाजातील असलेले ज्ञान पाजळलेले आहे व त्यांना कामकाजातील कितपत अनुभव आहे हे यावरून लक्षात येते.
चालू सिझन सन २०२२-२३ मध्ये जगदाळे यांनी कारखान्यातील कंत्रटी कामाचा ठेका स्वताच्या नातेवाईकांना दिलेला होता. सदर पार्टीचे उर्वरित बिलास आर्थिक अडचणीमुळे विलंब झाल्यामुळे असे आरोप करण्याची बुद्धी सुचलेली आहे.
मुख्यमंत्री कारखान्याच्या मोळी पूजनासाठी आले होते त्यावेळी कारखान्यातील अंतर्गत रस्ते करणे, मुरूम टाकणे व कारखाना परिसर साफसफाई करणे इत्यादी कामे ठेकेदारा मार्फत केलेली आहेत. सादर ठेकेदाराची बिले जगदाळे यांच्या चेकवरील सहीने अदा केलेली आहेत. साखर विक्री प्रकिया मा. संचालक मंडळ यांच्या मंजुरीने व अवलोकनाने केलेली आहे, केंद्र सरकारकडून बफर स्टोक अनुदानापोटी आलेल्या रक्कमेतून जि.एस.टी. ची सर्व देणी शासनाकडे भरणा केलेली आहे. त्याचे रीतसर चलन कारखाना दफ्तरी आहे. कारखान्यातील काही कर्मचारींची पगार ८५% वरून १००% करताना नियमानुसार व संचालक मंडळ सभेने मान्यता दिल्यानंतर केलेले आहेत. सबंधित कर्मचारी यांचेकडून पैसे घेतल्याचा आरोप, साखर विक्रीत पैसे घेतलेचा आरोप व कामकाजा संदर्भातील आरोप केवळ आकसबुद्धीने व बालिशपणाने केलेला आहे.
जगदाळे यांची पात्रता नसताना देखील बागल गटाने त्यांना वेळोवेळी सामाजिक व राजकीय पदे, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती उपसभापती, श्री आदिनाथ कारखाना संचालक पद दिले तरीदेखील स्वताचे स्वार्थासाठी व राजकीय द्वेषाने बागल गटाबरोबर गद्दारी केली. त्यामुळे इतर राजकीय गटातील नेत्यांनी अशा स्वार्थी व पात्रता नसलेल्या व्यक्ती पासून सावध राहावे.
जगदाळे यांचे सर्व आरोप चुकीचे असून आमच्या प्रत्येक निर्णयात जगदाळे यांचा सहभाग होता, ते प्रत्येक बैठकीस व चर्चेस उपस्थित होते. आम्ही कोणताही भष्टाचार केलेला नाही. रात्रंदिवस पळून कारखाना चालू केला. शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवला, आता फक्त राजकीय दृष्टीने, स्वताच्या स्वार्थासाठी, बालिश बुध्दीने व बिनबुडाचे असे आरोप केले जात आहेत. जगदाळे यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसून आमच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत असेही डोंगरे म्हणाले.
चौकट
नितीन जगदाळे हे आमच्या सोबत प्रत्येक निर्णयात सहभागी होते. प्रत्येक बैठकीस व चर्चेस उपस्थित होते. आता फक्त राजकीय दृष्टीने, स्वताच्या स्वार्थासाठी, बालिश बुध्दीने व बिनबुडाचे असे आरोप करत आहेत. जगदाळे यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसून आमच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत असेही डोंगरे म्हणाले.