हिवरवाडीमध्ये साजरा झाला विधवा सन्मान सण
करमाळा प्रतिनिधी
हिवरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा सन्मान सणाचे आयोजन करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या आगळ्या वेगळ्या आणि अभिनव सणाच्या निमित्ताने हिवरवाडीच्या सरपंच अनिता बापूराव पवार, युवाकार्यकर्ती सुप्रिया पवार यांनी विधवा प्रथा बंद करा हे पथनाट्य तसेच मुधोजी कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर इंगळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे(+२ स्तर) जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संगीता पैकेकरी यांच्या मागदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी हिवरवाडी येथील विधवांना समारंभपूर्वक ओवाळून हळदी कुंकू देवून त्यांना मिठाई देण्यात आली तसेच “विधवा प्रथा” असे लिहिलेले कागद मेणबत्तीवर जाळून हिवरवाडी ग्रामस्थांनी विधवा प्रथा कायमची बंद करण्याचा निर्धार व्यक्त केला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा. प्रदीप मोहिते यांनी एका व्हीडीओ क्लीपद्वारे केलेल्या आवाहनास अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या संयोजक सुप्रिया पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी अशा प्रकारचा सण आणि विधवा प्रथा बंदीचा निर्धार राज्यातील कदाचित पहिलाच सण असावा असे मत प्रा. लक्ष्मण राख यांनी व्यक्त केले तर इथून पुढे दैनंदिन जीवनात विधवांना सन्मानाने वागवले जावे अशी अपेक्षा डॉ. संगीता पैकेकरी यांनी बोलून दाखविली. प्राचार्य सुधीर इंगळे यांनी इतिहासातील राष्ट्रमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वैधव्यावर मात करून इतिहासाला भरीव योगदान दिल्याची आठवण करून दिली आणि त्यांचा आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून विधवा प्रथेचे उच्चाटन करणे आवश्यक असल्याचे प्रभावी सादरीकरण केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मधुकर पवार, बिभीषण सांगळे, आल्फिया शेख, राम गोडगे, अमृता आरणे, रिया परदेशी, साक्षी बोबलट, संगीता गोविंद पवार, जावेद मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.