शिवसेनेने जागतिक महिला दिन आरोग्याची गुढी उभारून केला साजरा
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड व युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी जागतिक महिला दिनानिमित्त किल्ला विभाग येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमामध्ये उद्घाटक शिवसेना माजी आमदार नारायण पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिता कन्हैय्यालाल देवी, माजी नगराध्यक्षा पुष्पा फंड व विद्या चिवटे, नोबल इंग्लिश स्कूल च्या सर्वेसर्वा एलिझाबेथ आसादे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, दोन दिवसानंतर गुढी पाडवा असून महिलांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विजयाची गुढी उभारली आहे परंतु, या धावपळीच्या जीवनात कुठेतरी आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामूळे आम्ही आरोग्याची गुढी उभारून म्हणजेच गुढीला हिरव्या पालेभाज्या, फळे, तुळस, आरोग्यवर्धक वनस्पती इ. लावून महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती केली आहे.
तसेच यावेळी ज्या महिला ब्युटी पार्लर चालवितात अशा महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी करमाळा शहरात पहिल्यांदाच ब्युटी क्वीन रॅम्प वॉक ठेवला होता. सदर रॅम्प वॉक ला भरपूर प्रतिसाद मिळाला. असुन यावेळी करमाळा तालुक्यात पहिल्यांदाच जोडीने म्हणजेच नवरा बायको यांचे होममिनिस्टर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे केले होते. तसेच खेळ पैठणीचा अंतर्गत विविध मनोरंजनाचे खेळ आयोजित केल्याने महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. अनेक महिलांनी महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ, नृत्य सादरीकरण केले.
यापुढे ही असेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रियांका गायकवाड यांनी सांगितले.