सीना कोळगाव प्रकल्प कालवा सल्लागार समितीची उन्हाळा आवर्तन संदर्भात बैठक संपन्न-आ. संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका अंतर्गत येणाऱ्या सीना कोळगाव प्रकल्पाची सन 2022 – 23 ची उन्हाळी हंगाम नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक आज दि.28 फेब्रुवारी रोजी उस्मानाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली असून या बैठकीमध्ये उन्हाळ्यात करमाळा तालुक्याला 2 आवर्तने देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, उन्हाळी हंगाम सन 2022 – 23 मधील सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज समिती सभागृह क्रमांक 5, सातवा मजला मंत्रालय येथे 4 वाजता बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कोळगाव प्रकल्पामधून करमाळा तालुक्यासाठी 2 आवर्तने देण्याचे निश्चित झाले असून सीना नदीद्वारे कव्हे बंधारापर्यंत पाणी सोडण्यात येणार असून त्याचा लाभ करमाळा तालुक्यातील आवाटी, नेरले, कव्हे या गावांना होणार आहे. तसेच उपसा सिंचन योजनेतून करमाळा बाजूकडे पाणी सोडण्यात येणार असून त्याचा लाभ सालसे, आळसुंदे,नेरले या गावांना होणार आहे. लवकरच उन्हाळ्याचे पहिले आवर्तन सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीसाठी पालकमंत्री ना.तानाजी सावंत, आ. संजयमामा शिंदे, कोळगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री मस्तूद, शाखा अभियंता चौगुले यांच्यासह पाटील आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.