पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळविणेसाठी बैठक संपन्न- शनिवार १८ मार्च रोजी ११ वाजता “एल्गार मोर्चा” द्वारे देणार निवेदन
करमाळा प्रतिनिधी:- जेऊरनंतर करमाळा तालुक्याचे पश्चिम भागातील पारेवाडी रेल्वे स्टेशन प्रवासी संघटनेने एल्गार मोर्चाचे आयोजन केले असलेबाबत कळविले आहे. आज शनिवार दिनांक-२५/०२/२०२३ रोजी विठ्ठल मंदीर- केत्तुर नं-२ येथे पश्चिम भागातील सर्व गट- पक्षाचे कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी यांची बैठक झाली. या वेळी
१९९७ सालापासुन वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासन पारेवाडी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना न्याय देत नाही याबद्दल निषेधही व्यक्त करण्यात आला. आजपर्यंत अनेकवेळा निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे मोर्चा आणि रेलरोको शिवाय आमचे समोर आता पर्यायच राहीलेला नाही. गाडी थांबवायची नसेल आणि फक्त सोलापुर , पुणे मुंबईलाच सुसाट गाड्या पळवायच्या असतील तर रेल्वे ट्रॅक बदलुन दुसरीकडुन घ्यावा.. आमचे कडे स्टेशन फक्त नावालाच आहे, आमचेकडे जलद गाड्यांना थांब्याची गरज आहे. हैद्राबाद- मुंबई आणि चेन्नई मेल या गाड्याना थांबा मिळविणेसाठी अनेकदा
विद्यमान खासदार साहेबांना देखिल निवेदने दिली आहेत.. रेल्वे विभागाला देखिल पत्रव्यवहार केला आहे, तरी देखिल दखल घेतली जात नाही. जेऊर आणि केमला काही गाड्या तरी थांबतात परंतु पारेवाडी स्टेशनपासुन ३० किमीचा प्रवास करून परत एक्सप्रेस गाडी पकडावी लागते याचा विचार रेल्वे प्रशासनाने आजपर्यंत केलेला नाही. निदान ट्रायल बेसिस वर तरी थांबा द्यावा. अशी मागणी प्रवाशातुन होत आहे. पारेवाडी स्टेशन आणि परिसरातील ग्रामस्थांनी या बैठकीतुन निर्धार व्यक्त केला असुन उद्याच्या १८ मार्च शनिवार रोजी दुपारी-११ वाजता एल्गार मोर्चाचे आयोजन केले असुन या मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.