सीना कोळगाव धरणग्रस्तांच्या वतीने आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मनःपूर्वक आभार:- सतीश नीळ
करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेच्या वतीने गेली दोन तपे ओलांडून गेले तरीही आम्ही धरणग्रस्त शेतकरी न्याय मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो, अनेक वेळा उपोषणे, रस्ता रोको आंदोलन,व सन 2012 साली गणेश चतुर्थी दिवशी उपोषण सुरू करून अनंत चतुर्दशी दिवशी गणेश बप्पा सोबतच धरणात जल समाधी घेण्यासाठी आम्ही धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे वतीने जवळपास 49 शेतकरी बांधव प्रत्यक्ष धरणाच्या पाण्यात जाऊन बसलो होतो परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री बोराडे साहेब यांच्या तत्परतेने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.याच वेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे करमाळा तालुक्यातील कार्यक्रमासाठी महेशराव चिवटे यांच्या घरी आले होते त्यावेळी मा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कडे मी व शहाजीराव देशमुख, महेशराव चिवटे यांनी धरणग्रस्तांना
न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली व दादांनी तात्काळ तत्कालीन पुनर्वसन मंत्री स्व.पतंगराव कदम साहेब यांना फोन केला व एक बैठक घेऊन सीना कोळगाव धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता व त्या अनुषंगाने दिनांक 4/10/ 2012 रोजी मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली व तसे लेखी पत्र तहसील कार्यालय करमाळा येथे फॅक्स द्वारे आले व आम्ही त्यावेळी आमचे जल समाधी आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर मंत्रालयात बैठक झाली परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नाही व शासकीय निर्णय/आदेश देण्यात आला नाही म्हणून मी व आमचे शेतकरी बांधव सातत्याने पाठपुरावा करत होतो. अनेक वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व सबंधित मंत्री, अधिकारी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कडे ही निवेदने देण्यात आली होती. काल पुन्हा एकदा पुनर्वसन मंत्री महोदय यांच्या कडे बैठक आयोजित करण्यात आली त्याबद्दल मी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो,व सर्व
धरणग्रस्तांच्या वतीने अभिनंदन करतो.परंतु मागील बैठकीतही खास बाब म्हणून दोन महिन्यांत जमिनी वाटप करण्यात याव्यात असे मंत्री महोदय यांनी आदेश दिलेले होते म्हणून मी माझ्या वैयक्तिक मालकीची एक एकर जमीन विक्री करून मा.विजयसिंह मोहिते पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार केला होता. आज 12 वर्षांनंतर सीना कोळगाव धरणग्रस्तांची पुनर्वसन मंत्र्याकडे बैठक झाली आहे आम्हा सर्वांना आनंद आहे. परंतु मागील बैठकीत ही राज्याच्या महाधिवक्त्यांचाच अभिप्राय मागविला होता, पुन्हा एकदा तोच विषय समोर आला आहे. असो माझी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने एकच विनंती आहे की, आत्ता तरी आम्हा धरणग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा व मी नागरी सत्कार करण्यासाठी जी जमीन विकली आहे त्याचे तरी फळ मिळावे एवढीच अपेक्षा आहे.