शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे दोनदिवसीय साहित्य संमेलन केमध्ये उत्साहात संपन्न
केम- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे विचार हे ग्रामीण भागात घरोघरी पोहोचायला हवेत असे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सीईओ श्री कौस्तुभजी गावडे यांनी व्यक्त केले. श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे आयोजित शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलन (वर्ष ४थे) या ठिकाणी प्रमुख उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश करे पाटील,श्री दिलीपदादा तळेकर , प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख, सरपंच श्री आकाश भोसले, श्री स्वप्नील शिंदे महाराज, श्री जयंत गिरी महाराज, श्री दयानंद तळेकर हे उपस्थित होते.
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलनामधून बापूजींच्या विचारांचा जागर निर्माण झाला पाहिजे, बापूजींचे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हे ब्रीद वाक्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजले पाहिजे. साहित्यिकांनी नवमहाराष्ट्र घडविला पाहिजे असे मत श्री कौस्तुभजी गावडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की हे साहित्य संमेलन म्हणजे करमाळा तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व रसिकांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री गणेश करे पाटील यांनी या उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कौतुक केले. येथील नवोपक्रम व हे साहित्य संमेलन हे सोलापूर जिल्ह्यासाठी इतिहास असेल असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना संस्काराचे महत्त्व सांगून चारित्र्य जोपासण्याविषयी सांगितले.
यावेळी प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख यांनी बापूजींचे शैक्षणिक कार्य याविषयावर परिसंवाद साधताना डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवन कार्याचा व त्यांच्या शैक्षणिक विचारांचा सखोल असा आढावा घेतला. बापूजींचे अनेक लपलेले पैलू त्यांनी आपल्या सुरेख व अभ्यासू अशा शैलीतून व्यक्त केले.
यावेळी प्रथम शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन महंत श्री जयंत गिरी महाराज व ह भ प स्वप्नील शिंदे महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी पाथुर्डी येथील चांदखण भजनी मंडळ यांनी तालासुरामध्ये दिंडीचे नेतृत्व केले. गावांमधून खूप मोठी अशी शोभायात्रा निघाली. त्यानंतर सरपंच श्री आकाश भोसले यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.गार्गी वसंत तळेकर हिने तर आभार प्रदर्शन कु.सिद्धी सचिन रणशिंगारे हिने केले.
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी केम गावातील स्थानिक कलावंत श्री विकास कळसाईत यांचा देशभक्तीपर बहारदार असा गीत गायनाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांनी व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर सिने कलावंत प्रा. सोहन कांबळे यांनी व्यसनमुक्तीपर अशी सुंदर नाटिका सादर केली व त्यातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.त्यानंतर बहारदार असे निमंत्रिताचे कवी संमेलन झाले.या कवी संमेलनाचे प्रमुख अध्यक्ष डॉ अंकुश
तळेकर हे होते.या कवी संमेलनामध्ये प्रा. डॉ.अरविंद हंगरगेकर, प्रा.डॉ.शिवाजीराव गायकवाड, प्रा. डॉ.अविनाश ताटे, श्री श्याम नवले,श्री मधुकर हुजरे, श्री हनुमंत पडवळ,श्री प्रकाशतात्या लावंड,श्री सोमनाथ टकले, श्री नवनाथ खरात, श्री खलील शेख, श्री शरद पाटील, श्री रणजित ढेरे, सौ मनीषाताई तळेकर, सौ. राजश्री मोरे,कु प्रज्ञा दीक्षित, कु.तेजस्विनी ओव्हाळ, कु. सानिका तळेकर, कु.भक्ती शिंगारे, कु.सानवी तळेकर, कु. प्रज्ञा तळेकर, कु. संजीवनी शेळके, कु. सत्यपाली ओहोळ इत्यादी कवींनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
केम सारख्या ग्रामीण भागात होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या साहित्य संमेलनासाठी प्राचार्य श्री सुभाष कदम,सर्व गुरुदेव कार्यकर्ते,शालेय समिती सदस्य, सर्व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.