राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते -आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित वाहतुक करणारे महामंडळ आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते. यावर्षी देखील 11/01/2023 ते 25/01/2023 या कालावधीत रा.प.महामंडळाकडून सुरक्षितता अभियान राबविण्यात येणार आहे. सदर कालावधीत रा. प. कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनपर भाषणे आयोजित करण्यात येतील.
या सुरक्षितता अभियानाचे महत्वाचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत.
- प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे.
- सर्व रा. प. कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे.
- सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देणे.
- रा.प.वाहनाना अपघात होणार नाहीत, यासाठी नेहमी योग्य ती काळजी घेणे.
या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील. रा.प.वाहनांचे अपघात होऊ नये तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याबाबत फक्त सुरक्षितता अभियानात नव्हे तर सदैव काळजी घेण्यासाठी हे एक उजळणी अभियान आहे.तसेच प्रवाशांसाठी काही मार्गदर्शनपर सूचना देखील आहेत. सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी रा.प.महा मंडळाला सहकार्य करा.बसच्या खिडकी मधून बस मध्ये सामान टाकू नका.बस च्या सीट्स चे कुशन्स खराब करू नका. बस मध्ये अनोळखी सामान आढळून आल्यास ताबडतोब ही गोष्ट कामगिरीवरील वाहकाच्या किंवा स्थानकप्रमुखांच्या निदर्शनास आणून द्या. तसेच बस मध्ये थुंकू नका. बस व बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवा. रा. प. परिवहन बस स्थानकानावरील स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर पाण्याचा योग्य वापर करावा.
रा. प. कर्मचारी व सर्व प्रवाशी यांच्या सहयोगाने हे रस्ते सुरक्षितता अभियान तसेच स्वच्छ बस, सुंदर बस स्थानक व टापटीप प्रसाधन गृह हे अभियान आपण चांगल्या रीतीने राबवू, असा विश्वास आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत व करमाळा आगार प्रशासनाने व्यक्त केला आहे.