करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी येथे १९९५/९६ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला.२८ वर्षांनंतर एकमेकांना व पुढील शिक्षणासाठी शाळा सोडुन गेलेली पाखरे गेट टुगेदर अर्थात स्नेह मेळावा व गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी बुधवार,१३ रोजी एकत्र आली.
प्रवेशद्वारावर डीजेच्या तालावर फटाके वाजवून या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ.महेश अभंग होते.पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन व टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना ते ज्या वर्गात शिकले त्या वर्गात सोडण्यात आले.सर्वचजण एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते.
प्रत्येकाचे बदलले रुपडे एकमेकांना व शिक्षकांना सहजासहजी ओळखु येत नव्हते.प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने सुरवात करुन सर्व विद्यार्थ्यांचा व उपस्थित सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.गत सातवीत असताना ७० च्या पुढे गुण असणा-यांना बाळासाहेब भिसे यांनी एअरमेल पेन पाच विद्यार्थ्यांना बक्षीस दिला होता याची आठवण ठेवून ३०० विद्यार्थ्यांना पेन भेट देण्यात आला.तसेच प्रशालेतील
कार्यालयाच्या दुरुस्ती साठी एका खोलीचे नवीन पत्रे व एक स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. प्रास्ताविक व सुत्रसंचलन सुनील चुत्तर यांनी केले.या वेळी रेखा कुटे,स्वाती शेटे,हेमा शिंदे,आनंद चुत्तर, हनुमंत खरात या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.डीजेच्या तालावर ४५ वर्षाचे तरुण तथा माजी
विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी चांगलाच ताल धरला मुले व मुली शाळेच्या मैदानावर फुगडी खेळल्या. खो-खो चा सामना रंगला.
दहावी झाल्यापासून पुन्हा एकदाही खो-खो न खेळलेली विद्यार्थी व विद्यार्थीनी मिळुन खो-खो खेळले, खेळताना अनेकांचा तोल जात होता दम लागत होता पण एकमेकांच्या आग्रहास्तव दहा मिनिटांचा खो-खो चा सामना चांगलाच रंगला.या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना आठवणी सांगून मनमुराद हसवले व सर्वांना मिष्टान्न भोजन दिले.सर्व कार्यरत , सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांना ट्राॅफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.बाळासाहेब भिसे, मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण -शिंदे, विठ्ठल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन सुनील चुत्तर यांनी केले तर आभार मनिषा क्षिरसागर हिने मानले.या बॅचचा दहावीचा निकाल कमी लागुन सुद्धा प्रत्येक जण आपापल्या पायावर भक्कम उभा राहिला आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील चुत्तर,सुभाष घाडगे,संदीप आदलिंगे,नवनाथ शिंदे,हेमा शिंदे,आनंद चुत्तर,अनिल कुऱ्हाडे, सौदागर शिंदे , मनिषा क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले
………
रेखा कोकरे – गोरेकडुन व सुनील चुत्तरकडुन दहावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस
या पुढे इयत्ता दहावीत प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येक वर्षी रेखा कोकरे -गोरेकडुन प्रथम रु :१५०१ , द्वितीय -१००१, तृतीय -रु.५०१ तर सुनील चुत्तरकडुन आपले वडील गौतम चुत्तर व मातोश्री यांचे स्मरणार्थ प्रथम रु.३००१, द्वितीय -२५०१,तृतीय -रु.२००१ अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली.